नेरळ / निनाद करमरकर : गाडीवरील ताबा सुटल्याने एका तरुणाचा अपघात झाल्याची घटना माथेरानच्या घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. जुमापट्टी परिसरात तीव्र वळणावर स्कुटरवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर तरुण फिरण्यासाठी माथेरानला आला होता. मात्र माथेरानला पोहचण्याआधीच घाटात काळाने त्याच्यावर झडप घातली.
कल्याण तालुक्यातील वरप इथं राहणारा 27 वर्षीय तरुण माथेरानला आला होता. जुमापट्टी परिसरात एका तीव्र वळणावर त्याचा स्कुटरवरील ताबा सुटला आणि त्याच्या स्कुटरने संरक्षक लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तरुण हा उडून लोखंडी रेलिंगला धडकला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, तर त्याच्या मागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाला उपचारासाठी तात्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या अपघाताबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने एसटी बसला धडक दिल्याची घटना बुलढाण्यात घडली. मेहकर-जानेफळ रस्त्यावर हा अपघात घडला. या धडकेत बसमधील 17 प्रवाशी जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. सर्व जखमींना मेहकरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.