‘जमीन खरेदीचा प्रस्ताव दिला, पण जागा मालकांचा फारसा प्रतिसाद नाही, रस्त्यासाठी आता थेट सक्तीने भूसंपादन करणार’
कल्याण शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरीकरणाकरीता 7.12 हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या रस्त्याच्या सहा पदरीकरणात निळजे, काटई, नेतीवली, कचोरे, सागव, सोनारपाडा, घारीवली, मानगाव याठिकाणची जमीन बाधित होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कल्याण (ठाणे) : कल्याण-शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामासाठी थेट जमीन खरेदीचे प्रस्ताव बाधितांसमोर ठेवण्यात आले होते. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया सक्तीने राबविली जाणार असल्याची माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरीकरणाकरीता 7.12 हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या रस्त्याच्या सहा पदरीकरणात निळजे, काटई, नेतीवली, कचोरे, सागव, सोनारपाडा, घारीवली, मानगाव याठिकाणची जमीन बाधित होणार आहे. सध्या या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. हा रस्ता यापूर्वी चौपदरी होता. सध्या अस्तित्वात असलेल्या चौपदरी रस्त्याचे सिमेंट कॉंन्क्रीटीकरण सुरु आहे.
येत्या आठवड्यापासून भूसंपादन करणार
मात्र सहाव्या पदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेकरीताही जमीन संपादनाची प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरु केली जाईल. त्यासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल. रेल्वे आणि रस्ते प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन करुन संपादनाची प्रक्रिया येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले.
रेल्वेच्या प्रकल्पासाठी देखील सक्तीने भूसंपादन
कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवड्यात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल, अशी देखील माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतमान होऊन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पबाधितांचा अत्यल्प प्रतिसाद
कल्याण ते कसारा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी 9.84 हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या प्रकल्पात बेरे, राये, पितांबरे, वावेघर, खडवली, बल्याणी, गुरवली, चिंचवली, मोस, मोहने, आंबिवली, मांडा, अटाळी, चिकणघर या गावातील जमीन बाधित होत आहेत. यामध्ये सातबाराचे 248 गट आहे. जमीन संपादनाकरीता उपविभागीय कार्यालयाकडून जमीनीच्या थेट खरेदीची प्रक्रिया राबविली गेली होती. त्यास अत्यल्प प्रतिसाद आला.
248 पैकी केवळ 5 गटांचे संपादन करण्यात आले आहे. कल्याण कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्याचा रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी भूसंपादन तातडीने होण्याकरीता थेट खरेदीची प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यातून संपादन होत नसल्याने आत्ता सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या आठवडाभरात केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आले, उबेर बुक केली, केवळ दोन लाखांसाठी निघृण कृत्य, सुन्न करणारी घटना