निखिल चव्हाण, प्रतिनिधी, ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाणे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा परिसरातील वनविभागाच्या जमिनीवरील दर्गा आणि मजरवर कारवाई संदर्भात अल्टिमेटम दिला. त्यानंतर मुस्लीम बहुल रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला. बहुसंख्य मुस्लीम परिसर असलेल्या मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. मागील दोन दिवसांपासून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आसपास जमाव मोठ्या प्रमाणात जमत होता. यातच ठाणे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्याशी भेट घेऊन जमाव हा मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार होता.
जमावाची रविवारी गणेश गावडे यांची भेट झाली नाही. सोमवारी स्वतः पोलीस उपायुक्त गणेश गावडे उपस्थित राहिले. त्यांनी जमलेल्या मुस्लीम जनसमुदायाला मुंब्रा परिसरातील कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था आबादित राहील, याची शास्वती दिली. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. 144 कलमाची नोटीस देखील त्यांनी अविनाश जाधव यांना जारी केली.
याचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील दिला. मुस्लीम जनसमुदायाच्या मागणीनुसार अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करणे ऐवजी 144 कलम जारी करून अविनाश जाधव यांना मुंब्रा परिसरात नो एन्ट्री केली. मुस्लीम समाजाचं समाधान झालं. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपायुक्त गणेश गावडे यांना दिले आहे.
सोमवारी संध्याकाळी रमजानची तयारी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय हा मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये जमला. उपायुक्त गणेश गावडे यांना भेटण्यासाठी हा जनसमुदाय जमा झाला होता. या जनसमुदायाची आणि मुस्लीम समाजाची मागणी एवढीच होती की एक तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकवण्याचा गुन्हा दाखल करावा किंवा त्यांना मुंब्रा हद्दीमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालावी.
या दोन्ही मागण्यासाठी मुस्लीम समुदायाने गावडे यांची भेट घेतली. गावडे यांनी त्यांना आश्वासन दिल्याने मुस्लीम जनसमुदायाचे समाधान झाले. मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रा हद्दीमध्ये प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन केलं तर त्यावर कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिला आहे.