VIDEO : रस्ते आणि नाल्याचं निकृष्ट दर्जाचं काम, आमदार संतापले, आमदारांसमोर अधिकारी एकमेकांवर भडकले
भाजप आमदार गणपत गायकवाड आज रस्त्यांच्या निकृष्ट कामकाजावरुन अधिकाऱ्यांवर भडकले.
कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिकेत येणाऱ्या आशेळेपाडा या भागात रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण आणि नाल्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे नाल्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन सुद्धा यावर्षी पाऊस सुरु होताच लोकांच्या घरात पाणी शिरले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज (3 ऑगस्ट) त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्ते आणि नाल्याचे काम पाहून आमदार संतापले.
गणपत गायकवाड यांची भूमिका
“एक तर रस्त्याच्या कामाला कुठली लेव्हल नाही. हे काम काही ठिकाणी अर्धवट आहे. दुसरीकडे नाल्याचे कामही निकृष्ट दर्जाचे आहे”, असं आमदार म्हणाले. या पाहणी दौऱ्या दरम्यान एमएमआरडीएचे अधिकारी अरविंद धाबे आणि अमोल जाधव उपस्थित होते. केडीएमसीकडून कार्यकारी अभियंते राजीव पाठक हे उपस्थित होते.
गणपत गायकवाड यांनी कामासंदर्भात विचारपूस केली असता एमएमआरडीएचे अधिकारी स्पष्टपणे उत्तरे देत नव्हते. त्यानंतर आमदार संतापले. “माझे शिक्षण कमी आहे. तरीपण तुम्हाला मी भरपूर गणितं शिकवू शकतो. तुम्ही चांगले काम केले असते तर देश सुधारला असता. तुम्ही पैसे खायचे, थुकपट्टी लावायची. नंतर आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात”, अशा शब्दात आमदारांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
अधिकारी एकमेकांवर भडकले
याच दरम्यान केडीएमसीचे अधिकारी राजीव पाठक आणि एमएमआरडीएचे अधिकारी एकमेकांची चूक दाखवत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आमदारांच्या समोरच वाद घातला.
“कामाच्या ठिकाणी विड्थ काढून देणे आणि यूटीलीटी शिफ्ट करणे ही जबाबदारी केडीएमसीची आहे. आम्हाला अडचणी येत आहे”, असं एमएमआरडीएचे अधिकारी अभियंता अरविंद धाबे यांनी सांगितले.
“कामाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी आहे. त्या आम्ही काढून देतो. दोन दिवसात अडचणी दूर करणार. त्यामुळे या कामाला कोणताही अडथळा येणार नाही”, असं केडीएमसीचे अधिकारी राजीव पाठक यांनी सांगितले.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :
भाजप आमदार भडकले pic.twitter.com/yLypOwynBe
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) August 3, 2021
हेही वाचा : केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेचे तीन तेरा, माजी नगरसेवकासह नागरिकांचा कचरा पेटवून निषेध