भाजप पदाधिकाऱ्यांचं वरिष्ठांना पत्र, श्रीकांत शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येत असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांना मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यातच आता दिवा भाजप मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
ठाणे | 18 मार्च 2024 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघाचे आहे. सध्या महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाने ही कल्याण लोकसभेला टार्गेट करत श्रीकांत शिंदेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येत असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांना मित्रपक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यातच आता दिवा भाजप मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्यापुढे आणखी एक आव्हान उभे केले आहे.
भारतीय जनता पार्टी दिवा शहरच्या वतीने दिव्यात नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील, नरेश पवार, विनोद भगत, जिल्हा चिटणीस विजय भोईर, सपना भगत, रोशन भगत, गणेश भगत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने यावेळी कल्याण लोकसभा निवडणुक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, असा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं आहे. या पत्राद्वारे कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच असो अशी आम्ही मागणी करण्यात आली आहे.
भाजप कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय?
“या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. येथे भाजपचे तीन आमदार आहेत. त्यातील एक मंत्री आहे. तसेच कल्याण ग्रामीण, डोंबिवली, दिवा मतदारसंघात देखील भाजपची ताकद मोठी आहे. मतदारांचा कौल देखील भाजपच्या बाजूने आहे. अब की बार 400 पार हे जे ध्येय्य आहे ते कमळ चिन्हावरच शक्य होईल. बाकी कोणत्या चिन्हावर शक्य होणार नाही. त्यामुळे आता फक्त कमळच”, असे सचिन भोईर यांनी म्हटले आहे. यामुळे भाजप आता येथे आपला उमेदवार देतो की शिंदे यांना दिवा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.