सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : गेल्या तीन-चार दिवसांत टोमॅटोच्या भावात प्रचंड वाढ झाली. टोमॅटो बाजारातून गायब झाले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो मिळत नसल्याचे चित्र आहे. कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका भावाने वाढदिवसाच्या पार्टीत आपल्या बहिणीला अनोखी भेट दिली. ती भेट म्हणजे दोन किलो टोमॅटो. तर, तिच्या मामा आणि मावशीने एक-एक असे दोन किलो टोमॅटो भेट देत तिचा वाढदिवस साजरा केला. कल्याण डोंबिवली परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव 140 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी जो टोमॅटो 20 रुपये किलोने मिळत होता. तो आता 140 रुपयांचा कसा झाला? महाराष्ट्रातील नाशिक, जुन्नर, पुणे येथून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही दिवसांतच अवकाळी पाऊस आणि राजस्थान बीपर जॉय या चक्रीवादळामुळे पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडले. मागणी वाढल्याने टोमॅटो मार्केटमध्ये गायब झाले आहेत.
टोमॅटो मार्केटमध्ये मिळत नसल्याने घरात स्वयंपाक करत असलेल्या गृहिणीमध्ये नाराजी दिसत आहे. कल्याण कोचडी परिसरात राहणाऱ्या सोनल बोरसे या महिलेचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त तिने आपल्या सगळ्या नातेवाईक यांना पार्टीसाठी आमंत्रण दिले होते. या पार्टीत सोनम यांच्या भावाने आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिला वाढदिवसानिमित्त चक्क टोमॅटो गिफ्ट दिले.
अचानक मार्केटमधून गायब झालेले टोमॅटो घरी पाहून ती आनंदित झाली. वाढदिवसानिमित्त सगळ्यात अनोखे आणि सगळ्यात महाग गिफ्ट असल्याचे सांगत तिने आनंद व्यक्त केला. दुसरीकडे भावाने आणि नातेवाईकांत टोमॅटो गिफ्ट दिल्याची बातमी पूर्ण शहरात पसरली. त्यामुळे तिचा वाढदिवस हा चर्चेचा विषय बनला आहे.
नांदेड शहरात पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांनी हैद्राबाद इथून टोमॅटोची आयात सुरू केलीय. वाहतूक खर्चामुळे सध्या नांदेडमध्ये प्रतिकिलो एकशे वीस रुपये इतक्या महागड्या दराने या टोमॅटोची विक्री होतेय. रोजच्या जेवणात लागणारा अविभाज्य घटक म्हणून टोमॅटो ओळखल्या जातो. त्यामुळे किंमतीत मोठी वाढ होऊनही ग्राहकांकडून टोमॅटोची मागणी होतेय.
स्थानिक पातळीवर टोमॅटोचे उत्पादन ठप्प पडले. व्यापाऱ्यांनी हैद्राबाद इथून भाजीपाला आयात करायला सुरुवात केलीय. एरव्ही हैद्राबादला भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या नांदेडला लांबलेल्या पावसामुळे यंदा प्रथमच आयात करायची वेळ आलीय.