ठाणे | 11 सप्टेंबर 2023 : ठाण्यातील बाळकुम भागात काल रात्री एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट (lift accident) कोसळून दुर्दैवी अपघात झाला. नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले. ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. मात्र तेवढ्यात लिफ्ट खाली कोसळल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. घरी जाण्याच्या ओढीने पटापट काम आटोपणाऱ्या कामगारांवरच ही लिफ्ट कोसळली आणि सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू (6 died) झाला. लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. अखेर या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी इमारतीच्या लिफ्ट आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विकासकांवर गुन्हा का नाही ?
६ जणांचा जीव घेणाऱ्या या अपघाताप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली होती. विकासकाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना झाली, असे प्रथम दर्शनी समोर येत आहे. सहा कामगारांना जीव गमवावा लागला, त्यांची घर उध्वस्त झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पोलिसांना विकासकावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र असे असूनही अद्याप विकासकावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विकासकावर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे, विकासकावर गुन्हा दाखल करायचा की नाही हे नंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांतर्फ देण्यात आली आहे.
नक्की काय झालं ?
बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले. ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. रविवार संध्याकाळची वेळ होती, काम आटोपल्याने कामगारही निवांतपणे घरी जात होते. तेवढ्यात ही घटना घडली. या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रुफिंगचं काम सुरू होतं. लिफ्टचा दोर तुटल्याने लिफ्ट घरी परतणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले.या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला. तर एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.