ठाणे| 13 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. याच रुग्णालयात गेल्या दोन दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेमकं काय झालं अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. 18 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 13 रुग्ण हे आयसीयूत होते. तर पाच रुग्ण हे जनरल वॉर्डमधील असल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावल्याने राजकीय पटलावरही पडसाद उमटले आहेत. सरकार विरोधी पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात जाऊन या घटनेची चौकशी केली. तसेच सरकारला या प्रकरणी धारेवर धरलं आहे. असं असताना ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय पाऊल उचलतात याकडे लक्ष लागून होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांसमोर आले आणि याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“मी या प्रकरणाची सकाळीच माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. दीपक केसरकरही त्या ठिकाणी पोहोचले असतील. आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने संपर्कात होते. वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.झालेली दुर्घटना दुर्देवी आहे आणि त्यावर तातडीने निर्णय घेतलेला आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही खासगी रुग्णालयातूनही आले होते. गंभीर स्थितीत त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्व बाबी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. तरीसुद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची सखोल चौकशी होईल.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.
एका दिवसात इतक्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मनसे, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्यंत अस्वस्थ कंडिशनमध्ये रुग्ण रुग्णालयात येत असतात. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका डॉक्टराने दिली.