डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेच्या जागेवरुन एक वक्तव्य केलय. त्यावरुन या सर्व चर्चा सुरु झाल्या आहेत. “कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपी उमेदवाराच्या दिशेने चालली आहे” असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं. “कल्याण लोकसभा ही पूर्वीपासून भाजपचीच होती. मात्र ज्या वेळेला भाजपचा काही चालत नव्हतं, त्यावेळेस स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी आपल्याकडे खेचून घेतली होती. आत्ता कुठेतरी भाजप वरचढ होत असताना दिसून येत असून, ते संधी सोडतील असं मला वाटत नाही” असं राजू पाटील म्हणाले. त्यावर आता भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलय.
“काही लोकांकडून महायुतीत विघ्न आणण्याच काम सुरु आहे” असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलय. महाराष्ट्रात शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील. 45 पेक्षा जास्त खासदार कसे निवडून आणता येतील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये कुठेतरी विरजण घालण्याच काम काहीजण करतायत. मला खात्री आहे, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून खासदार होतील” असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील असं भाजपा नेते सांगत आहेत.
वाद नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे मूळच ठाण्याचे. आता दोन गट आहेत, एक शिंदे गट आणि ठाकरे गट. शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यात ताकद आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघावरही त्यांची पकड आहे. याच कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र श्रींकात शिंदे खासदार आहेत. मध्यंतरी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजपात अंतर्गत धुसफूस वाढली होती. काही कुरबुरी होत्या. पण आता अंतर्गत स्पर्धा नाहीय, श्रीकांत शिंदेच खासदार होतील, असं सांगून रविंद्र चव्हाण यांनी कुठलाही वाद नसल्याच स्पष्ट केलय.