डोंबिवली / 27 जुलै 2023 : डीमार्टमधून सामान खरेदी करुन घरी चाललेल्या जोडप्याला भरधाव रिक्षाने धडक दिल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. पादचारी आणि इतर वाहन चालकांनी दाम्पत्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार करुन परतल्यानंतर पीडितांनी मानपाडा पोलिसात अज्ञात रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकाचा शोध सुरु केला आहे. रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेतील रिक्षा चालकांमुळे असे अपघात घडतात. यामुले पादचारी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंबिवलीतील घारिवली गावात एम्स रेसिडन्सीमध्ये राहणारे कैलास गुप्ता गृहोपयोगी सामान विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री गुप्ता पत्नीसह मानपाडा रोडवरील डीमार्टमध्ये सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. डीमार्टमधून सामान खरेदी करुन दोघे घरी परतत होते. यावेळी रस्ता ओलांडताना डोंबिवली स्थानकाकडून येणाऱ्या भरधाव रिक्षाने दामप्त्याला जोरदार धडक दिली.
रिक्षाच्या धडकेत दाम्पत्य जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले. यावेळी तेथून चाललेल्या पादचाऱ्यांनी आणि वाहन चालकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्यानंतर गुप्ता यांनी मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.