Ganesh Naik : जेल की बेल? गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय; बलात्कारप्रकणी अटकेची टांगती तलवार कायम
महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी तसेच बलात्कार केल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर ही अटकेची (Arrest) शक्यता आहे. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
ठाणे : भाजपा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे (Thane) न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी न्यायमूर्ती एन. के. ब्रह्मे यांच्यासमोर सुनावणी काल होणार होती. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून याबाबत गुरुवारी म्हणजेच आज अंतिम निर्णय देणार असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. त्यामुळे अद्यापही गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी तसेच बलात्कार केल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर ही अटकेची (Arrest) शक्यता आहे. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात आपल्याला जामीन मिळावा, असा अर्ज गणेश नाईक यांनी केला होता.
काल कोर्टात काय झाले?
भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात काल ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. त्यात न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र गुप्ता यांच्या ऐवजी एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात सुनवणी पार पडली. गणेश नाईक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढे वर्षे प्रेम संबंध असताना आता असे आरोप करणे म्हणजे राजकीय दबाव व फायद्यासाठी केले जात आहेत. तसेच 376 कलम हे लावले हे योग्य नाही, असा युक्तीवाद करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांकडून युक्तीवाद न्यायाधीश यांनी ऐकला आणि याबाबत अंतिम निर्णयायासाठी आता आजची तारीख दिली गेली.
काय प्रकरण?
पीडित महिला गणेश नाईक यांच्यासोबत 1993पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा आहे. या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी आपल्याला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.