बारसूतील आंदोलनात स्कार्फ घालून घुसलेले ते कोण?; दीपक केसरकर यांचा सवाल
शेतकऱ्यांना 50 हजार रुपये द्यायचे कबूल केले पण देऊ शकले नाही. केंद्र शासन जितके पैसे देतं तितके शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होतात. खरी मदत आम्हीच देतो, असं केसरकर म्हणाले.
बदलापूर : बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. मात्र, हा विरोध ठाकरे गटाच्या चिथावणीमुळेच होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. केवळ पोलिसांची बदनामी व्हावी म्हणून ज्या महाराष्ट्रात महिलांचा सर्वाधिक सन्मान केला जातो. तिथे महिलांना समोर करायचं, जमिनीवर लोळायला लावायचं, भर उन्हात राजकारणासाठी त्यांना बसवायचं ही भूमिका चुकीची आहे. त्यांनी चर्चेला यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, असं आव्हानच दीपक केसरकर यांनी दिलं आहे. तसेच बारसूत स्कार्फ घालून काही लोक घुसले होते. ते कोण आहेत? याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी केसरकर यांनी केली.
बारसूतील ग्रामस्थांना उत्कृष्ट रेट हवा असेल तर त्यांना कधीही कमी पडणार नाही इतके पैसे महाराष्ट्र शासन देईल. परंतु युवकांसाठी काहीतरी करावे लागेल. युवकांच्या नावाने सहानुभूती घेत सर्वत्र फिरणाऱ्यांनी कोणतेही उद्योग महाराष्ट्रात आणले नाहीत. त्यामुळे आम्ही ज्यावेळी उद्योग महाराष्ट्रात आणतो त्यावेळी अडथळा निर्माण केला जातो. इथून माणस पाठवायची, इथून फोन करायचे आणि वातावरण बिघडवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं, असं दीपक केसरकर म्हणाले. बदलापूर येथे मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे आव्हान दिलं.
ते कोण?
मुद्दाम हे घडावं आणि पोलिसांवर आरोप यावा सरकारवर आरोप यावा याचा हे षडयंत्र आहे. ते कोण करतय हे शोधून काढलं गेलं पाहिजे. स्कार्फ लावून आंदोलन करणाऱ्यांच्या तोंडावरचे स्कार्फ काढले पाहिजेत. मगच ते बारसूचे आहेत की अन्य कुठले हे महाराष्ट्राला कळेल. आंदोलन करणाऱ्यांपैकी किती लोकांच्या जमिनी केल्या आहेत ते सुद्धा समोर आलं पाहिजे. ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी ज्यादा दरासाठी आंदोलन केलं. युवकांनी रोजगारासाठी आंदोलन केलं किंवा शेतकऱ्यांनी मदत मिळावी म्हणून आंदोलन केलं तर समजू शकतो. परंतु दोन दोन लाख युवकांना लवकरात येणारा प्रकल्प इथे नको म्हणून कोणत्याही कारण न सांगता आंदोलन करणे योग्य नाही, असं ते म्हणाले.
कशाचंही नुकसान होणार नाही
हा झिरो डिस्चार्जचा प्रकल्प असून एकही थेंब समुद्रामध्ये जाणार नाही. एकाही मच्छीमाराचं नुकसान होणार नाही. आंबा, काजू, नारळ यांचंही कोणतं नुकसान होणार नाही. ज्या ठिकाणी प्रकल्प होतोय तिथे एकही घर नाही. कोणीही विस्थापितही होणार नाही, ही सगळी वस्तुस्थिती असताना फक्त विरोधाला विरोध करायचा असंख्य मुलांचे स्वप्न बेचिराख करायची हा अधिकार कोणाला आहे असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले.
तुम्ही काय केले?
ज्यांच्या सभेत कुणाची खुर्ची लहान आणि कुणाची खुर्ची मोठी यावरून वाद होतात, त्यांची वज्रमुठ किती ताकदीने एकत्र आली आहे याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीतरी करण्याची संधी होती, त्यावेळी तुम्ही जनतेसाठी काय केलं? याचा विचार केला पाहिजे. काम करणारे काम करत राहतात, टीका करणारे टीका करत राहतात, पण जनतेनं विचारलं पाहिजे की तुम्ही काय केलं? असं ते म्हणाले.