ठाकरे गट संपवण्यासाठीच सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादीने पाठवलं; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव झाला आहे. त्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीय. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ठाणे: राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवलं आहे, असा दावा करतानाच सुषमा अंधारे या पूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे, असं शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. ते कल्याण येथे आले असता मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि भाजपची युती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांना बोलता येतं. काही लोकांना कृती करता येते. ज्यांनी सीमा भागाच्या सुविधा बंद करून ठेवल्या होत्या, त्यांना असं बोलणं शोभत नाही. आम्ही सुविधा सुरू केल्याच, पण कोर्टातल्या केसलाही गती दिली. सीमाभागाचं राजकारण पेटवून राजकारण करणाऱ्यांचा महाराष्ट्रानं विचार करण्याची गरज, असं दीपक केसरकर म्हणाले.
यावेळी त्यांनी सीमावादाच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे मंत्री असताना मंत्रालयात गेले असते तरी पुरे झालं असतं. तुम्ही साध्या मिटिंग घेतल्या नाहीत. आरोप करणं सोपं असतं. राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असते, असा टोला त्यांनी लगावला.
खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या भूमीत छत्रपतींचा अपमान योग्य नाही. राज्यपालांनी खुलासा द्यायला हवा होता, पण दिला नाही. आम्ही केंद्राकडे भावना पोहोचवल्या आहेत. सरकार बंधन आणू शकत नाही, असंही ते म्हणाले.
हिमाचल प्रदेशात भाजपचा पराभव झाला आहे. त्यावरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीय. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हिमाचल प्रदेशात दर 5 वर्षांनी सरकार बदलत हा रेकॉर्ड आहे. दिल्लीत बदल घडला. कामं केली नाही की बदल होतो, हा मेसेज आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपची युती होईल, असं ते म्हणाले.