वसई : राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. असं असतानाच वसई महावितरणाच्या हलगर्जीपणाचा फटका शाह कुटुंबीयांना बसला आहे. वसई पश्चिमच्या अंबाडी रोड येथील सत्यम बंगल्यात राहणा-या शाह कुटुंबीयांच्या घरातील वातानुकूलीन यंत्रानं अचानक पेट घेतला. मात्र, फटाक्यांची दुकाने आणि अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. यामुळं मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवलं आहे. आगीची घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वसई येथील बंगलो आणि शेजारी इमारतीमध्ये मागील तीन महिन्यांपासून विजेचा प्रॉब्लेम सुरु आहे. बिल्डींगच्या आणि बंगल्याच्या रहिवाशांनी याबाबत महावितरणाला तक्रारी दिल्या होत्या.
मात्र, त्याकडे महावितरण विभागाने कानाडोळा केला. येथील घरांच्या एसी, फ्रिज इत्यादी जास्त वीज लागणारी विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नव्हती. कित्येकांची फ्रिज नादुरुस्त झाली होती. मात्र, महावितरणाने वेळीच लक्ष दिलं नाही. त्यामुळं एसीला आग लागल्याचा घरच्यांचा आरोप आहे.
या आगीत शाह कुटुंबीयांच्या घराचं नुकसान झालंय. सुदैवाने ऐन दिवाळीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती सत्यम बंगल्याच्या मालकीण पल्लवी शाह व शेजारी किरीटभाई जोशी यांनी दिली.
एकीकडं दिवाळीचा उत्साह सुरू आहे. तर दुसरीकडं ही आग लागली. वसईसारख्या ठिकाणी हा एसी जळाला. त्वरित उपाययोजना करण्यात आल्यानं मोठी जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.