डोंबिवलीतील 5 वर्षीय चिमुकलीची गगनभरारी, वडिलांसोबत गाठले एव्हरेस्टचे बेस कॅम्प
पाच वर्षाच्या चिमुरडीने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या पाचव्या वयात मुलीने केलेल्या पराक्रमाबाबत सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
डोंबिवली : प्रत्येकाला आयुष्यात एका उंचीवर जाण्याची इच्छा असते. कधी कोणाला श्रीमंतीने उंची गाठायची असते, कधी कोणाला विचाराने तर कधी कोणाला उच्च पदी विराजमान होऊन उंची गाठावी अशी आशा असते. मात्र डोंबिवलीतील एका 5 वर्षाच्या चिमुरडीने तिच्या वडिलांसमवेत जगातील उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर जाऊन अनोखी उंची गाठली आहे. डोंबिवलीतील 5 वर्षीय प्रिशा निकाजू आणि लोकेश निकाजु या बाप-लेकीने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत जाण्याचे ठरवले आणि नऊ दिवसात 17 हजार 598 फूट उंचीवर पोहचले. बाप लेकीच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.
ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर कोणतंही शिखर सर करता येते. या वाक्याला साजेशी कामगिरी केवळ पाच वर्षीय चिमुकलीने करुन दाखवली आहे. प्रिशा लोकेश निकाजु हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपल्या वडिलांसह एवरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा पराक्रम केला आहे. ज्या वयात लहान मुलं खेळण्यात, दंगामस्ती करण्यात गुंग असतात, त्याच वयात प्रिशाने एव्हरेस्ट चढण्याचा निर्धार केला.
कशी केली तयारी?
प्रिशाचे वडील लोकेश नीकाजू यांना ट्रेकिंगची आवड आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ माऊंटेनियारींग अँड अलाईड स्पोर्ट्स या संस्थेतून ट्रेकिंग काराचे प्रशिक्षण घेतले आहे. दर शनिवार, रविवार ते प्रिशाला घेऊन ट्रेकिंगला जात असल्याने प्रिशाला ट्रेकिंग करायची आवड निर्माण झाली. एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाण्याआधी डोंबिवलीतील पलावा फेज 2 मध्ये राहणारी प्रिशा रोज 5 ते 6 मैल चालत असे. तिला कराटे, टेबल टेनिस, पोहणे आवडते. त्यामुळे ती सतत या सर्व खेळांचा सराव करत असते.
प्रिशा दोन वर्षांची असल्यापासून ट्रेकिंग करते. इतकेच नव्हे तर तिने सिंहगड, लोहगड, विसापूर, कर्नाळा, सोंडाई, कोथळी गड, प्रबळमाची, कलावंतीण, रायगड असे गड सर केले आहेत. तिने वयाच्या तिसऱ्या वर्षी कळसूबाई शिखर सर केले आहे.
‘असा’ होता या बाप-लेकीचा प्रवास
24 तारखेला नेपाळमधील लुकला या ठिकाणाहून त्यांनी ट्रेकिंग सुरु केली. 6 तास ट्रेकिंग करत फाकडिंग या ठिकाणी पोहचले. तेथे रात्री आराम केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ट्रेकिंग सुरू केलं. सायंकाळी 7 वाजता म्हणजे 11 तासांची ट्रेकिंग करून नामचे बजार या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी टेंगबोचे आणि चौथ्या दिवशी टेंगबोचे ते डेबूचे, पाचव्या दिवशी डिंगबोचे येथे पोहचले. सहाव्या दिवशी त्या ठिकाणीच मुक्काम केला. सातव्या दिवशी त्यांनी डिंगबोचेपासून आपला प्रवास सुरु केला. लोबूचे या ठिकाणी प्रवास करत त्याच ठिकाणी आठव्या दिवशी मुक्काम केला आणि अखेर शेवच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी लोबूचे ते एव्हरेस्टचा बेस कॅम्प प्रवास करत जमिनीपासून 17 हजार 598 फूट उंची गाठली.