शुभमंगल ऑनलाईन ! मुलगा सातासमुद्रापार, वडिलांचा पुढाकार, डोंबिवलीतून अनोख्या पद्धतीत विवाह
वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा लावून दिला (Dombivali youth online marriage from Canada).
डोंबिवली (ठाणे) : कोरोना संकटामुळे अनेक तरुण-तरुणींचे लग्न पुढे ढकलण्यात आले. काही जणांनी 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. तर काहिंनी आणखी वेगळ्या पद्धतीत लग्न केलं. मात्र, डोंबिवलीतील विवाह सोहळा अनोख्या पद्धतीत पार पडला. इतकंच नव्हे तर या लग्नात वधू-वर चक्क सातासमुद्रापार कॅनडाला होते. वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या एकुलत्या एक मुलाचा विवाह सोहळा लावून दिला (Dombivali youth online marriage from Canada).
नवरदेवाचं बालपण डोंबिवलीत
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गाव परिसरात डॉ. हिरामन चौधरी यांच्या मुलाचं लग्न ऑनलाईन पद्धतीत आयोजित करण्यात आलं. त्यांचा मुलगा भूषण चौधरी हा डोंबिवलीत लहानाचा मोठा झाला. त्याने सात वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. तो सात वर्षांपूर्वी कॅनडाला गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला तिथेच नोकरी लागली. नोकरीमुळे तो कॅनडात स्थायिक झाला (Dombivali youth online marriage from Canada).
कोरोनामुळे 2020 पासून लग्न रखडलं
याच दरम्यान भूषणचं मनदीप कौर या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही आपल्या कुटुंबाला विवाहाबद्दल इच्छा बोलून दाखवली. चौधरी आणि कौर कुटुंबानेदेखील या दोघांना विवाहाची परवानगी दिली. मात्र, 2020 पासून कोरोनामुळे त्यांना भारतात येता येत नव्हते तर त्यांच्या कुटुंबियांना कॅनडा जाता येत नव्हते. त्यांची फोनवर लग्नाबद्दल बोलणी व्हायची. मात्र कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमधील बंधने यामुळे त्यांच्या लग्नाची तारीख दोन वर्षांपासून निश्चित होत नव्हती.
अखेर ऑनलाईन लग्न करण्याचं ठरलं
अखेर या दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांचा ऑनलाईन विवाह करण्याचं ठरवलं. त्यानुसार चौधरी आणि कौर कुटुंबाने तयारी सुरू केली. लग्नासाठी लागणारे सर्व सामान कुरियरच्या माध्यमातून भूषणला कॅनडा येथे घरपोच करण्यात आले. त्यानंतर आज ठरलेल्या मुहूर्तावर चौधरी कुटुंबाच्या डोंबिवली येथील घरी भटजी आले. विवाह ऑनलाईन होणार असल्याने नातेवाईकांची गर्दी नव्हती.
ऑनलाईन विवाह सोहळा कसा पार पडला?
भटजी कॅनडा येथे असलेल्या भुषण आणि मनदीप यांना ऑनलाइन लाईव्ह व्हिडियोच्या माध्यमातून लग्नाचे विधी सांगतायचे. त्यांनी सर्व विधी ऑनलाईन करवून घेतले. त्यानंतर अखेर कॅनडा येथे राहत असलेल्या भूषण आणि हरदीपचा डोंबिवली येथून ऑनलाईन विवाह संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावलेल्या नातेवाइकांनी आणि चौधरी कुटुंबाच्या मित्रपरिवाराने नववधू,वराला ऑनलाईनच आशीर्वाद दिले. अक्षदा देखील ऑनलाईनच टाकले. या लग्नानंतर वराचे वडील डॉय. हिरामन चौधरी यांनी या विवाह सोहळ्याबद्दल आंनद व्यक्त केला. तसेच इतरांनाही कोरोना काळात अशाच पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे आवाहन केलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते निव्वळ टाईमपास करतायत: दरेकर