Dombivli Crime : क्षुल्लक कारणावरून तरूणाची रिक्षा चालकाला शिवीगाळ, दगड मारून रिक्षाही फोडली
रिक्षा चालक आणि मोटर सायकल चालकामध्ये वाद झाला. क्षुल्लक कारणावरून मोटारसायकल चालकाने त्या इसमास शिवीगाळ केली. तसेच संतापाच्या भरात गड हाणून त्याची रिक्षा फोडली. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 3 ऑक्टोबर 2023 : शहरातील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. याच खड्ड्यामुळे अनेक अपघातही घडले आहेत. मात्र आता याच खड्ड्यांमुळे लोकांचे जीव आणखी संकटात सापडले आहेत. त्यांच्यात वाद होऊन नुकसानही झाल्याचे समोर आले आहे. समोर आलेला खड्डा वाचवण्यासाठी ब्रेक मारणं हे एका रिक्षा चालकाला (auto driver) खूपच महागात पडलं. ब्रेक मारल्यामुळे एका बाईकची रिक्षाला धडक बसली आणि तो बाईकस्वार याच रिक्षाचालकाच्या अंगावर धावून आला. त्याला शिवीगाळ करत त्याच्या रिक्षाचेही नुकसान केले.
डोंबिवली पूर्व (dombivli crime) येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून आरोपीने दगड मारून रिक्षाची काच फोडून मोठे नुकसान केले. ही संपूर्ण घटना त्याच परिसरातील एका रिक्षा चालकाने मोबाईल कॅमेऱ्यात केली. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये पीडित रिक्षा चालकाने तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
खड्ड्यासमोर ब्रेक मारणं महागात पडलं
प्रशांत सावंत असं पीडित रिक्षा चालकाचं नाव असून ते डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान परिसरात राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी रिक्षा सुरू केली आणि एक भाडं घेऊन ते डोंबिवली पूर्वेला गेले. तेथे पाथर्ली चौकामध्ये रस्त्यावर असताना रिक्षा समोर एक खड्डा आला. तो वाचवण्यासाठी सावंत यांनी अचानक ब्रेक मारला. मात्र त्यामुळे त्यांच्यापाठोपाठ असलेल्या इतर रिक्षा चालकांनाही ब्रेक मारावा लागला. त्याच रिक्षांचा पाठी एक तरूण बाईकवर होता. त्याच्या बाईकचा ब्रेक लागत नसल्याने त्याची पुढल्या रिक्षाला धडक बसली व तो तरूण संतापला.
खाली उतरून तो पुढे आला आणि सावंत यांना जाब विचारू लागाल. रस्त्यावरील खड्ड्यामुळे ब्रेक मारल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. मात्र तुमच्यामुळेच माझं नुकसान झालं असं सांगत त्या तरूणाने सावंत यांच्याकडे नुकसान भरपाई मारण्यास सुरुवात केली. पण माझा यात काहीच दोष नाही ना काही चूक झाली. हे नुकसान माझ्यामुळे झालं नाही असं सांगत सावंत यांनी पैसे देण्यास नकार दिला.
यामुळे तो बाईकस्वार तरूण चांगलाच भडकला आणि त्याने रिक्षा चालक सावंत यांना भररस्त्यात , सर्वांसमोरच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रस्त्यावरचा एक दगड उचलून सावंत यांच्या रिक्षावर मारला आणि रिक्षाची तोडफोड केली. यामध्ये त्यांच्या रिक्षाची काट फुटली आणि बरेच नुकसान झाले. ही संपूर्ण घटना दुसऱ्या रिक्षाचालकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या घटनेनंतर रिक्षाचालक सावंत यांनी डोंबिवली टिळक नगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.