धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरटा डोंबिवली आरपीएफ पोलिसांच्या जाळ्यात
शनिवारी दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी कोपर स्टेशनवर कसारा लोकल थांबली होती. हा आरोपी याच लोकलमध्ये बसून होता. ट्रेन सुरू होताच 57 वर्षीय शिवाजी विष्णू बोगार्डे नावाच्या प्रवाशाच्या हाताला झटका देत मोबाईल खेचून त्याने पळ काढला.
डोंबिवली : रेल्वे गाडी सुरु झाल्यावर स्टेशन संपण्याच्या आधी प्रवाशांच्या हाताला झटका देत मोबाईल घेऊन रेल्वे फलाटावरून पळणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली आरपीएफ पोलिसांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडले. मोहम्मद सुखरुद्दीन जाकीर शेख असे या सराईत मोबाईल चोरट्याचे नाव असून तो मूळचा झारखंड येथील राहणारा आहे.
कोपर स्थानकावर मोबाईल हिसकावून पळताना चोरटा अटकेत
शनिवारी दुपारी 2 वाजून 24 मिनिटांनी कोपर स्टेशनवर कसारा लोकल थांबली होती. हा आरोपी याच लोकलमध्ये बसून होता. ट्रेन सुरू होताच 57 वर्षीय शिवाजी विष्णू बोगार्डे नावाच्या प्रवाशाच्या हाताला झटका देत मोबाईल खेचून त्याने पळ काढला. बोगार्डे यांनी आरडा-ओरड केला. रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा शर्मा, एमएसएफ कर्मचारी अक्षय ईश्वर येळकर आणि जीआरपी कर्मचारी पीसी यादव यांनी आरोपीचा पाठलाग केला. या चोरट्याला रेल्वे स्टेशन बाहेर एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी पकडले. अटक आरोपीला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून प्लॅटफॉर्मवरुन गाडी सुटली की ट्रेनची गती वाढताच प्रवाशांच्या हातातले मोबाईल घेऊन हा चोरटा पसार होत होता. या सराईत चोराचा शोध कल्याण-डोंबिवली, ठाणेसह इतर रेल्वे सुरक्षा बल जीआरपी व इतर पोलीस अनेक दिवसांपासून घेत होते. या चोराला आरपीएफ पोलिसांनी पकडल्याने या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता
प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या घटनांमध्ये काही दिवसांत खूपच वाढ झाली आहे. अशा घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नुकतीच कल्याण रेल्वे स्थानकात अशीच एक घटना घडली होती. या घटनेत सुद्धा ट्रेनमध्ये महिला बसली असताना तिच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटा पसार झाला. कल्याण जीआरपीने या चोरट्याला अटक केली होती. इतकेच नाही तर शहाड स्थानकात असाच एक प्रकार घडला होता. महिलेचा मोबाईल हिसकावून चोरटा पसार झाला. त्यालाही पोलिसांनी पाठलाग करुन पकडले होते. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी थेट ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना निशाणा केला आहे. चोरट्याची हिंमत इतकी वाढली आहे की, चोरटे स्थानकात जाऊन धावत्या लोकलमधून लोकांचे मोबाईल हिसकावून पळतात. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी ठोस पावले उचलली पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
इतर बातम्या
5 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा उपअधीक्षक चतुर्भुज; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई