नाल्याचं पाणी घरात, पाण्यासह विंचू, सापांचंही आगमन, स्थानिक भडकले, थेट नाल्यात बसून आंदोलन
राज्यात एकीकड कोरोना संकट असताना कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमधील नागरिकांना वेगळ्या छळाला सामोरं जावं लागत आहे (Drain water coming in houses at Kalyan Mahatma Phule nagar).
कल्याण (ठाणे) : राज्यात एकीकड कोरोना संकट असताना कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमधील नागरिकांना वेगळ्या छळाला सामोरं जावं लागत आहे. इथे पाऊस पडला की लोकांच्या घरात घाणेरडं नाल्यांचं पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय नाल्याचं पाणी थेट घरात शिरल्याने घरात प्रचंड घाणीचं साम्राज्य निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हा त्रास भोगणाऱ्या नागरिकांनी अनेकवेळा कल्याण डोंबिवली महापालिकेकडे तक्रारही केली आहे. मात्र, प्रशासन याकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीय. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट नाल्यात बसून केडीएमसी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाल्यात बसून आंदोलन केलं. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला (Drain water coming in houses at Kalyan Mahatma Phule nagar).
नेमकं प्रकरण काय?
महात्मा फुलेनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्याचं काम सुरु आहे. खरंतर काम सध्या बंद आहे. काही दिवसांपूर्वी नाल्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. पण नाला ज्या भगातून काढण्यात आला आहे तिथे दोन स्थानिकांचा जागेवरुन वाद सुरु आहे. त्यामुळे काम प्रलंबित आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, या वादावरुन परिसरातील शेकडो नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागत आहे. परिसरातील नाल्याच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने ते पाणी थेट सर्वसामान्यांच्या घरामध्ये जात आहे. त्यांनी अनेकदा याविषयी तक्रारही केली. पण अजूनही त्यांच्या समस्येचं निराकरण झालेलं नाही (Drain water coming in houses at Kalyan Mahatma Phule nagar).
नाल्याच्या पाण्यातून साप, विंचू येतात, नागरिकांचा दावा
सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे नाल्याचं पाणी परिसरातील घरांमध्येही शिरत आहे. याशिवाय या पाण्यासोबतच साप, विंचू देखील येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे पाऊस पडायला सुरु झाला की परिसरातील नागरिक चिंतेत पडतात. अनेकांच्या मनामध्ये नाल्याच्या पाण्यातून पुन्हा साप आणि विंचू येईल, अशी भीती निर्माण झाली आहे. केडीएमसी महापालिका एकीकडे स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देते, मग महात्मा फुले परिसरातील नागरिकांच्या व्यथा महापालिका प्रशासनाला का कळत नाही? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत.
महापालिकेची नेमकी भूमिका काय?
स्थानिकांनी नाल्यात बसून आंदोलन केल्यानंतर आम्ही केडीएमसी महापालिकेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्या नाल्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्याठिकाणी काही लोकांनी जागेसंदर्भात हरकती घेतल्या. सध्या प्रक्रिया सुरु असून जागेचा वाद मिटल्यानंतर नाल्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा : पोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू