कल्याण : कल्याणच्या चिकनघर परिसरात हाय प्रोफाईल हत्ये प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुलानेच घरगुती वादातून वडिलांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यावेळी मध्ये येणाऱ्या आईवरही मुलाने प्राणघातक हल्ला केला असून यात आई जखमी झाली आहे. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीलतील एका फ्लॅटमध्ये रविवारी एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आणि पत्नी व मुलगा जखमी अवस्थेत आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी जखमी मुलाकडे चौकशी केली असता त्याने वडिलांनी आपल्यावर व आईवर हल्ला करुन स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता वेगळेच सत्य समोर आले.
मयत प्रमोद बनोरिया यांचे आपल्या 27 वर्षीय मुलगा लोकेश याच्याशी सतत वाद होत होते. लोकेश हा सध्या शिक्षण घेत आहे. शनिवारी रात्रीही नेहमीप्रमाणे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने रागाच्या भरात वडिलांवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या आईवरही लोकेशने 8 ते 10 वार केले. यात लोकेशची आई कुसुम या जखमी झाल्या आहेत. यानंतर स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. तसेच आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने आईला दिली होती.
रात्रभर जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरात ठेवत पहाटेच्या सुमारास सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याची माहिती दिली. सोसायटीमधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरातील सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. लोकेशने वडिलांनीच आपल्यावर आईवर हल्ला करीत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा पोलिसांकडे केला होता. मात्र पोलिसांना लोकेशवर संशय होता. पोलिसांनी तपास सुरू केला. डॉक्टर आणि पोलिसांनी आईला विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर तिने मुलाच्या गुन्ह्याचा पाढा वाचला. (Due to a domestic dispute, the son killed his father in Chikanghar in Kalyan)
इतर बातम्या