सरडे रंग बदलतात, पण एवढे… एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; बाळासाहेबांच्या स्मारकावरूनही सुनावले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपशी जवळीक वाढवण्याबाबत तीव्र शब्दांत टीका केली आहे. ठाकरे कुटुंबाच्या भाजपशी झालेल्या भेटीनंतर शिंदे यांनी "सरडे रंग बदलतात, पण इतक्या वेगाने नाही" असा टोला लगावला. त्यांनी ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाबाबतही चोख उत्तर दिलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही करण्यात आलं होतं. त्यामुळे ठाकरे कुटुंब हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. भाजपने राजकारणात काहीही होऊ शकतं, अशा सूचक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सापांना जवळ करून नका, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केलं होतं. त्यानंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरडे रंग बदलतात हे माहीत होतं, पण इतक्या वेगाने बदलतात हे माहीत नव्हतं, असा जळजळीत टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टोलेबाजी केली. मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. तू राहील मी राही अशी भाषा केली. अजून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली? सरडे रंग बदलतात. पण एवढे फास्ट वेगाने रंग बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत, असा हल्लाबोलच एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
स्मारक कुणाच्याही मालकीचं नाही
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील. त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ठाकरेंच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असं ते म्हणाले. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचं स्मारक कोण बांधतोय? सरकार बांधतंय. बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
कुणालाही सोडणार नाही
बीड प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. सरकार कुणालाही सोडणार नाही. कुणालाही पाठिशी घालणार नाही. पुरावे आणि कायद्यानुसार जी कारवाई करायची ती करण्यात येणार आहे, तसं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही दिलं आहे. तसेच कुणी कितीही मोठा असला, कुणाचे कुणाशीही लागेबांधे असले तरी आम्ही कुणालाही सोडणार नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
साताऱ्याला जाणार
दरम्यानस एकनाथ शिंदे हे चार दिवसाच्या सातारा दौऱ्यावर जात आहेत. साताऱ्यातील दरे या मूळ गावी ते मुक्कामाला जाणार आहेत. दरे येथे उत्तेश्वर देवसाथानाची जत्रा आहे. त्यासाठी ते आजच दरे गावाकडे रवाना होणार आहेत.