Thane Nashik Road : खड्डेच खड्डे, जिकडे तिकडे चोहीकडे, रस्ता माझा गेला कुणीकडे? नाशिक-ठाणे महामार्गाची ही दुरावस्था पाहा
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तसेच वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने बराच वेळ जातोयं. पावसाळ्याच्या अगोदर रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, असे असताना देखील रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत.

ठाणे : ठाण्यातील (Thane) रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं. ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होतंय. साकेत पुलावरील खड्डे बुजले गेले नसल्याने वाहतूक कोंडीचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालायं. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी (Traffic jam) होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा बघायला मिळातायंत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दोन दिवस अगोदर ठाण्यासाठी विशेष बैठक घेऊन देखील वाहतूक कोंडीची समस्या कायमच आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली विशेष बैठक
ठाण्यातील रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेऊन वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांचा प्रश्न अजूनही कायमच आहे. त्यामुळे ठाणे नाशिक भिवंडी आणि घोडबंदर याठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.



रस्त्याचे युद्धपातळीवर काम नाहीच
रस्त्याचे PWD, MMSDC, MMRD कडून अजून देखील युद्धपातळीवर काम होताना दिसत नाही. तसेच खड्डे बुजवण्याची जी प्रशासनाची कामे आहेत, ती वाहतूक पोलिस करताना दिसत आहे .या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासन कधी खड्डे बुजवणार असा सवाल उपस्थित केला जातोयं. साकेत पुलावर तर रस्त्याची चाळण झालीयं.
खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसच मैदानात
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तसेच वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने बराच वेळ जातोयं. पावसाळ्याच्या अगोदर रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, असे असताना देखील रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत. विशेष म्हणजे महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम आता चक्क वाहतूक पोलिसच करत आहेत. खड्डयामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसच आता खड्डे बुजवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.