Ulhasnagar Crime : उल्हासनगरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला बेड्या, आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या शहर सचिवाचाही समावेश
उल्हासनगरच्या हनुमान टेकडी परिसरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण हे दुचाकी आणि रिक्षेनं कुणावर तरी हल्ला करण्याच्या आणि लूटमार करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने दोन टीम रवाना करत या टोळक्याला अडवलं.
उल्हासनगर : उल्हासनगरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिवाचाही समावेश असल्यानं शहरात खळबळ माजली आहे. या टोळक्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रं (Weapon) जप्त करण्यात आली आहेत. एका इसमावर हल्ला (Attack) करण्यासाठी हे टोळके हत्यारे घेऊन चालले होते. सुधीर सिंग, नन्हे राय, फौजी लबाना, सुमित जेठवानी, सुरज लोट आणि युनूस अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सुधीर सिंग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्हासनगर शहर सचिव असून पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांचा तो निकटवर्तीय मानला जातो.
हल्ला करण्याआधीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
उल्हासनगरच्या हनुमान टेकडी परिसरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण हे दुचाकी आणि रिक्षेनं कुणावर तरी हल्ला करण्याच्या आणि लूटमार करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने दोन टीम रवाना करत या टोळक्याला अडवलं. यावेळी त्यातले दोन जण पोलिसांच्या हाती लागले, तर उर्वरित पळून गेले. यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये 3 तलवारी, 1 कोयता, 1 रॉड आढळून आला. पकडण्यात आलेल्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी पप्पू शिंदे याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि लुटमार करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं.
दरोड्याचा प्रयत्न आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून आणखी 4 जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी सुधीर सिंग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्हासनगर शहर सचिव असून पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांचा तो निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Gang arrested including the NCP city secretary in Ulhasnagar preparing for robbery)