बकरी पडली आजारी, बकरीला घेऊन इसम थेट पालिकेत, केडीएमसी मुख्यालयात अजब प्रकार
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयात आज एक अजब प्रकार बघायला मिळाला. एक इसम त्याची बकरी घेऊन थेट महापालिकेच्या मुख्यालयाच्या गेटमध्ये शिरला. यावेळी सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ झाली. या सुरक्षा रक्षकांनी संबंधित इसमाला अडवलं. यावेळी या इसमाने आपला संताप व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकीकडे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना आता उपचारासाठी जनावरांना सुद्धा वणवण फिरावं लागतं आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाच्या बकरीला आजार झाला. या इसमाने पालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या इसमाने अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा इसम थेट आपली बकरी घेऊनच पालिका कार्यालयात शिरला. तो पालिका मुख्यालयात बकरी घेऊन शिरत असताना गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ झाली. सुरक्षा रक्षकांनी बकरी आणि आंदोलनकर्त्यांला पालिका कार्यालयाच्या बाहेर काढले. या इसमाने उपरोधिकपणे निषेध करत व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्वे परिसरात राहणारे मनोज वाघमारे यांच्या बकरीचे पोट अचानक फुगू लागल्याने बकरी अस्वस्थ झाली होती. या बकरीचा इलाज करण्यासाठी वाघमारे यांनी हॉस्पिटलबाबत माहिती काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागाकडे फोन लावला. मात्र या फोनला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी पालिका उपायुक्तांना फोन लावला. त्यांच्याकडूनही अपेक्षित माहिती मिळाली नाही. अखेर संतापलेल्या वाघमारे यांनी आपल्या बकरीला घेऊन थेट कल्याणमधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश केला.
यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. त्यामुळे काही काळ पालिका आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. पालिका प्रशासन फोनचे बिल भरत नाही का? त्याचप्रमाणे नेमकं प्राण्यांचा इलाज कुठे करायचा? याची माहितीच मिळत नसेल तर करदात्या नागरिकांनी काय करायचं? असा प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला.
सुरुवातीला जनावरांचा दवाखाना बैल बाजार परिसरात होता. मग तो दवाखाना गेला कुठे? रामभरोसे आहे का? असा प्रश्न त्यांनी व्यक्त करत पालिका प्रशासनावर थेट निशाणा साधला. एकीकडे शहरात स्मार्ट सिटीचा गाजावाजा सुरू आहे. तर दुसरीकडे माणसांना देखील इलाजासाठी दुसरीकडे जावं लागतं तर तिथे जनावरांचं काय? अशी खंत कल्याण डोंबिवलीकरांकडून व्यक्त होताना दिसत आहे.