एकनाथ शिंदेंच्या गडात भाजपाचा पालकमंत्री? अनेक जणांची भाऊगर्दी, कोण होणार ठाण्याचा किल्लेदार?
Thane Guardian Minister BJP : मुख्यमंत्री पदावर पाणी सोडल्यानंतर आता ठाण्याच्या बालेकिल्ल्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांना अजून एक धक्का मिळण्याचे संकेत मिळत आहे. एकनाथ गडात आता भाजपाचा पालकमंत्री होणार असल्याची चर्चा रंगलीच नाही तर इच्छुकांची नावं सुद्धा समोर आली आहे.
महायुतीची त्सुनामी अवघ्या महाराष्ट्रानेच नाही तर उभ्या देशाने पाहिली. त्यात भाजपाची लाट दिसून आली. सर्वाधिक जागा घेत भाजपाने तोच महायुतीत मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. काल झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडल्याचे दिसले. त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. पण त्यांना अजून एक पाऊल मागे यावं लागेल असं दिसत आहे. त्यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच आता भाजपाचा पालकमंत्री व्हावा यासाठी फिल्डिंग लागली आहे. इच्छुकांची पालकमंत्री पदासाठी भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे. त्यात अनेक दिग्गजांची नावं समोर येत आहेत.
भाजपाची ठाण्यात जोरदार मुसंडी
विधानसभा निवडणुकीत भाजपाने ठाणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. ठाणे जिल्ह्यात भाजपाचा 100 टक्के स्ट्राईक रेट दिसला. शिंदे सेनेने पण जोर लावत कमाल दाखवली. ठाणे जिल्ह्यातील 9 पैकी 9 जागा भाजपाने खिशात घातल्या. तर शिंदे सेनेला 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवता आला. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. पण स्ट्राईक रेटनुसार भाजपा येथेही मोठा भाऊ असल्याचा दावा करत आहे. तीन जागा अधिक निवडून आल्याने भाजपाने पालकमंत्री पदासाठी दावा ठोकल्याची चर्चा आहे.
शिंदेशाहीला जोरदार धक्का
गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. फाटाफुटीनंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. ठाणे जिल्ह्याचे पालकत्व मिळवण्यासाठी भाजपाने मोठा दबाव आणला. पण त्यांना यश आले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात भाजपाचा दबाव दिसून आला. आता पालकमंत्री म्हणून भाजपाचा शिलेदार असावा यासाठी भाजपाने दबाव वाढवला आहे. हा शिंदेशाहीला पहिला मोठा धक्का मानण्यात येत आहे.
या तीन नावांची चर्चा
मुरबाड मतदारसंघातून किसन कथोरे यांनी चौकार ठोकला आहे. ते सलग चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघात निवडून आले आहे. तर रवींद्र चव्हाण यांनी आत ठाणे तर तळकोकणापर्यंत मजबूत संपर्काच्या जोरावर दबदबा वाढवला आहे. त्यांचा परीघ मोठा आहे. दुसरीकडे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी सुद्धा हॅटट्रिक साधली आहे. त्यांच्या पण नावाची पालकमंत्री म्हणून चर्चा रंगली आहे. ठाण्यात भाजपाचा पालकमंत्री झाल्यास तळकोकणापर्यंत त्याचा संदेश जाणार हे निश्चित आहे.