निनाद करमरकर, प्रतिनिधी, ठाणे : काही दाम्पत्याला बाळ नको असते. अशावेळी डॉक्टरशी ते संपर्क साधतात. पण, ते बाळ झाल्यास त्यांचा कसा फायदा आहे, ते समजावून सांगितलं जातं. नको असलेले बाळ ज्यांना बाळाची गरज आहे, त्यांना विकलं जातं. असा बाळांच्या खरेदी-विक्रीचा गोरखधंदा काही ठिकाणी चालतो. उल्हासनगरात एका महिला डॉक्टरने नवजात बाळांच्या खरेदी विक्रीचा बाजार मांडल्याचं उघड झालंय. नवजात बालकांची लाखो रुपयांना विक्री करताना सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी या डॉक्टरला रंगेहात पकडलं. यामुळं शहरात खळबळ माजली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील कंवरराम चौक परिसरात डॉक्टर चित्रा चैनानी यांचं महालक्ष्मी नर्सिंग होम आहे. याठिकाणी नवजात बालकांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांची मदत घेत एक बनावट ग्राहक तयार केले.
तिला मुलगा हवा असल्याचं डॉक्टर चित्रा चैनानीला सांगितलं. त्यानुसार या डॉक्टरने नाशिकहून आलेल्या एका महिलेचं २२ दिवसांचं बाळ या महिलेला दाखवलं. सात लाख रुपये किंमत सांगितली. हा सौदा केला जात असतानाच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकली.
डॉक्टर चैनानी आणि विक्रीसाठी आणलेल्या बाळाच्या आईला ताब्यात घेतलं. ठाणे क्राईम ब्रँच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे झाले. याठिकाणी ज्यांना बाळ नको आहे आणि ज्यांना बाळाची गरज आहे, अशांची गाठभेट करून दिली जाते. मध्यस्त म्हणून डॉक्टर चैनानी काम करत होती.
तसंच जितक्या लाखात सौदा झाला आहे, त्यापैकी जवळपास अर्धे पैसे डॉक्टरला मिळत होते. मुलाचा आणि मुलीचा रेट वेगवेगळा होता. असे अनेक धक्कादायक खुलासे तिच्या चौकशीतून झाले. या रॅकेटमध्ये महाराष्ट्राबाहेरील सदस्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्या दिशेनं सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.