अंबरनाथमध्ये पालिकेचे गाळे व्यावसायिकांनी बळकावले, काही गाळ्यांमध्ये भरतोय चक्क जुगाराचा अड्डा
पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गाळेधारकांनी गाळ्यांच्या टॅक्स पावत्या स्वतःच्या नावावर करून घेत मोठमोठ्या रकमांना हे गाळे विकले. त्यामुळे पालिकेची आणि एकप्रकारे हे गाळे विकत घेणाऱ्यांचीही आर्थिक फसवणूक झाली आहे. ही बाब लक्षात येताच पालिकेने टॅक्स पावत्या पुन्हा पालिकेच्या नावावर करून घेत संबंधित गाळेधारकांची भोगवटादार म्हणून नोंद केलीय.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात पालिकेचे 19 गाळे भाडेकरू व्यावसायिकां (Traders)नी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वर्षांच्या लीझ (Lease)वर दिलेले हे गाळे व्यावसायिकांनी परस्पर विकल्याचंही समोर आलं असून याप्रकरणी आता अंबरनाथ पालिकेनं कारवाई करत गाळे आपल्या ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. अंबरनाथ पश्चिमेला रेल्वे स्थानकाच्या बाहेरच पालिकेनं साधारण 30 वर्षांपूर्वी 19 गाळे उभारले होते. 1992 साली हे गाळे व्यावसायिकांना 300 रुपये महिना भाड्यावर 3 वर्षांच्या लीझवर देण्यात आले होते. मात्र 1995 नंतर या गाळ्यांचं लीझ ऍग्रिमेंट संपलं, त्याचं पुन्हा नूतनीकरणच करण्यात आलं नाही. (In Ambernath, the premises of the municipality were seized by the traders)
गाळेधारकांकडून पालिकेची आणि गाळे विकत घेणाऱ्यांची फसवणूक
पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गाळेधारकांनी गाळ्यांच्या टॅक्स पावत्या स्वतःच्या नावावर करून घेत मोठमोठ्या रकमांना हे गाळे विकले. त्यामुळे पालिकेची आणि एकप्रकारे हे गाळे विकत घेणाऱ्यांचीही आर्थिक फसवणूक झाली आहे. ही बाब लक्षात येताच पालिकेने टॅक्स पावत्या पुन्हा पालिकेच्या नावावर करून घेत संबंधित गाळेधारकांची भोगवटादार म्हणून नोंद केलीय. तसेच हे गाळे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आणि मागील अनेक वर्षांचं भाडं, तसेच थकीत टॅक्स भरण्यासाठी गाळेधारकांना पालिकेनं नोटीसा बजावल्या आहेत. यानंतर हे गाळेधारक कोर्टात गेले असून पालिकेनंही याप्रकरणी कॅव्हेट दखल केलं आहे. तर आगामी सॅटिस प्रकल्पासाठी ही जागा मोकळी करावी लागणार असून त्यावेळी हे गाळे निष्कासित केले जाणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.
काही गाळ्यांमध्ये मटका आणि जुगार अड्डे
धक्कादायक बाब म्हणजे या पालिकेच्या मालकीच्या असलेल्या या 19 गाळ्यांपैकी काही गाळ्यांमध्ये चक्क मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्यामुळे पालिकेने आधी हे अवैध धंदे तरी तातडीने बंद करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे या गाळेधारकांनी त्यांचा अनेक वर्षांचा मालमत्ता कर सुद्धा भरलेला नाही. त्यामुळे त्यांची 32 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी 17 फेब्रुवारी 2022 रोजी पालिकेने या गाळेधारकांना एक महिन्याची नोटीस पाठवली होती. मात्र तिचीही मुदत संपली, तरी गाळेधारकांनी नोटीस गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे आता पालिका यावर कधी आणि काय कारवाई करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (In Ambernath, the premises of the municipality were seized by the traders)
इतर बातम्या
‘ती’ 14 गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणार, एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा