आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी खरंच एकत्र लढणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पराटील यांनी मोठं विधान केलं आहे. जलसंपदा मंत्री सोमवारी (25 ऑक्टोबर) कल्याण शहराच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं.
कल्याण (ठाणे) : राज्यात आगामी काळात मुंबई, पुण्यासह काही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष एकत्र की स्वबळावर लढणार? हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातोय. पण ते अद्याप स्पष्टपणे उघड झालेलं. पण राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. जलसंपदा मंत्री सोमवारी (25 ऑक्टोबर) कल्याण शहराच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
“आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे असे आम्ही करणार नाही. आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात येत्या महापालिका निवडणुकांम्ध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला त्याठिकाणी कडवं आव्हान असेल.
आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी खरंच एकत्र लढणार? मंत्री जयंत पाटील यांचं महत्त्वाचं विधान#JayantPatil #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi pic.twitter.com/bN5kJCGfMU
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
जयंत पाटील यांचा संवाद दौरा
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संवाद सुरु आहे. त्यांचा संवाद दौरा सध्या कल्याण डोंबिवीलीत पोहोचला आहे. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जयंत पाटील सोमवारी कल्याणमध्ये पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. त्यानंतर पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सुजित रोकडे, वंडार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण डोंबिवीलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांवर भाष्य
जंयत पाटील कल्याणमध्ये आले आणि त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन न बोलणं असं होऊच शकत नाही. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी त्यांना कल्याण डोंबिवीलीतील खड्ड्यांच्या दुर्देशेबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “मागच्या सरकारच्या काळात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गाजला होता. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रचंड मोठे दुर्लक्ष तत्कालीन सरकारने केले होते. आमच्या सरकारने खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले आहे”, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.
पप्पू कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय होतील?
जयंत पाटील यांनी सोमवारी उल्हासनगरात माजी आमदार पप्पू कलानी यांची देखील भेट घेतली. त्यामुळे ते पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. पण यावर जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. “उल्हासनगरात कार्यकर्त्यांची बैठक संपल्यावर माजी आमदार पप्पू कलानी यांनी चहा करीता मला बोलविले होते. त्याठिकाणी चहापानासाठी मी गेलो होते. मात्र कलानी यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट आहे.
हेही वाचा :
‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय’, समीर वानखेडेंवरील आरोपांवरुन भातखळकरांचा घणाघात