Jitendra Awhad : लाउडस्पीकर बंद करता, मग रेल्वेचा 175 डेसिबल आवाज कसा चालतो? एसी लोकलवरून आव्हाडांचा सरकारला सवाल
पिक अवरमध्ये एसी लोकल चालू देणार नाही. 4 ते 5 हजार लोक रेल्वे रूळावर उतरले तर नियंत्रणात येणे मुश्किल होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
ठाणे : बॉम्ब तयार आहे, त्याला आग कधी लागेल सांगता येणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. एसी लोकलच्या मुद्द्यावरून आव्हाड आक्रमक झाले आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यानंतर कळवा आणि बदलापूर येथील प्रवासी आक्रमक झाले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने एसी लोकल (AC local) बंद करून साध्या लोकल सुरू केल्या मात्र तरीदेखील प्रवासी आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला इशाराच दिला आहे. रात्री 10नंतर धावणाऱ्या मेलचा आवाज 175 डेसिबलचा असतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत आहेत. लहान मुलांना त्रास होत आहे. अनेक इमारतींना तडे गेलेत. त्यामुळे जी कारवाई डेसिबल (Decibel) संदर्भात करता, ती रेल्वेवर करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
‘…तर नियंत्रणात येणे मुश्किल’
हे सहन केले जाणार नाही. मला माझ्या लोकांचा विचार करायचा आहे. माझे आंदोलन एसी विरूद्ध गरीब आहे. पिक अवरमध्ये एसी लोकल चालू देणार नाही. 4 ते 5 हजार लोक रेल्वे रूळावर उतरले तर नियंत्रणात येणे मुश्किल होईल. माझी भूमिका प्रत्येकवेळी पक्षासाठी किंवा स्वत:साठी नसते. रेल्वेला रेल्वे प्रवाशांची ताकद माहिती नाही. रेल्वे रूळावर प्रवासी उतरले तर त्यांना तुम्ही गोळ्या मारणार. पण किती जणांना तुम्ही गोळ्या मारणार, प्रत्येक स्टेशनला प्रवासी रेल्वे रूळावर उतरेल, देशाची सेना जरी आणली तरी फरक पडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आव्हाडांचा इशारा
‘मी रेल्वेने प्रवास केलेला माणूस’
मी आंदोलनात का सहभाग घेतला तर मी रेल्वेने प्रवास केलेला माणूस आहे. तुम्ही जर ठरवले तर कोणाच्याही बापात हिंमत नाही निर्णय विरोधात देण्याचा. असे तुम्ही सर्व स्टेशनवर एकत्र आले ना त्याची दखल रेल्वेला घ्यावी लागेल, तुम्ही हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, असे प्रवाशांना आव्हाड म्हणाले. ध्वनी प्रदुषण होते म्हणून दहानंतर लाउडस्पीकर बंद करतात. रेल्वेचा आवाज तर 175 डेसिबल असतो, त्याचे काय करणार असा सवालच आव्हाडांनी केला आहे.
‘दहानंतर जाणारी प्रत्येक मेल आम्ही थांबवू’
हे थांबवले नाही तर दहानंतर जाणारी प्रत्येक मेल आम्ही थांबवू. जर डेसिबल कमी झाला नाही तर रेल्वे रूळावर उतरून आंदोलन करू. मग त्यात रेल्वे प्रवासी असोत किंवा रेल्वेतून प्रवास न करणारे असोत. त्यांचा त्या आंदोलनात सहभाग असेल. रेल्वेच्या जीवावर आम्ही नाहीत आमच्या जीवावर रेल्वे आहे, असे आव्हाड म्हणाले.