‘त्या’ काय इंदिरा गांधी आहेत का?; सुप्रिया सुळेंवर आरोप करणाऱ्या सोनिया दुहन यांना आव्हाडांचं प्रत्युत्तर
Jitendra Awhad on Sonia Duhan Statement About Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरमहिला नेत्याने आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांबाबत प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिप्रश्न केला आहे. जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? वाचा सविस्तर...
युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले, युवा नेते धीरज शर्मा यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली. धीरज शर्मा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सोनिया दुहन या देखील पक्ष सोडणार का? अशी चर्चा रंगली. या सगळ्यावर बोलताना सोनिया दुहन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत, असा आरोप सोनिया दुहन यांनी केला. शिवाय मी अजूनपर्यंत तरी राष्ट्रवादी शरद पवार गटातच आहे, असं म्हणत सोनिया यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना उत्तर दिलं आहे.
आव्हाडांचं प्रत्युत्तर
सोनिया दुहन यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनिया दुहन यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारला. त्यावर सोनिया दुहन ही पक्षाची इंदिरा गांधी आहे का?, असा सवाल करत आव्हाडांनी बोलणं टाळलं.
सोनिया दुहन काय म्हणाल्या?
शरद पवार हे आमचे नेते होते, आहेत आणि कायम राहतील. शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळे यांचा आदर आहेच. पण सुप्रिया सुळे कधीच आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत.मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. परंतू मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही, असं म्हणत सोनिया दुहन यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केलेत. शिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याचे संकेतही सोनिया यांनी दिलेत.
कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्याकारणाने त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती समजली असेल की, ती काय चांगली नाही. छगन भुजबळसाहेब ही म्हणतात की, महाराष्ट्राची परिस्थिती चांगली नाही. त्यांचे अजून दोन-तीन मंत्री असं म्हणाले आहेत. मला त्यांची काय नाव घ्यायची नाही, त्यांना जे दिसतंय ते बोलतायेत. महायुतीत मतभेद हाणामारी होऊ द्या. मला काय घेणं देणं? मी घरात बसून चाय पितो. चार तारखेपर्यंत आराम आहे. आराम करू द्या, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी राज्याच्या राजकारणातील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.