घराच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये 7 वर्षाचा मुलगा खेळत असताना अचानक ग्रील तुटली, थरकाप उडवणारी घटना
श्वास रोखून धरावा अशी धक्कादायक घटना कल्याणच्या कोळशेवाडीत आज घडली. एक सात वर्षाचा मुलगा खिडकीच्या ग्रीलमध्ये खेळत होता. यावेळी ती ग्रील अचानक तुटली. यावेळी मुलाने प्रचंड आरडाओरड केली. त्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आला आणि त्याच्या प्रसंगावधानामुळे त्याचा अतिशय थरारकपणे जीव वाचला.
कल्याणमध्ये अतिशय थरारक घटना घडली. कल्याण पूर्वेत कोळशेवाडी परिसरातील ही घटना घडली. घराच्या खिडकीच्या ग्रीलमध्ये 7 वर्षाचा मुलगा खेळत असताना अचानक ग्रील तुटली. यावेळी मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने धाव घेत ग्रील पकडून ठेवली. यावेळी मुलगा वंश लांडगे सज्जावर अडकला. घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांना देण्यात आली. यानंतर अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाची सुखरूप सुटका केली. वंशचे आई-वडील बाहेर गेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांचा अशरक्ष: थरकाप उडाला होता. अर्थात ही घटनाही अगदी श्वास रोखून धरावा अशीच होती. पण 7 वर्षाच्या चिमुकल्याची आता सुखरुप सुटका झाली आहे.
संबंधित इमारत ही चार माळ्यांची आहे. घटना ही तिसऱ्या माळ्यावर घडली. घराच्या किचनमधील जी खिडकी असते त्या खिडकीचा काच उघडून मुलगा बाहेर सेफ्टी ग्रीलच्या इथे बसला होता. यावेळी सेफ्टी ग्रील तुटल्याने आधी तो त्या ग्रीलवर लटकून राहिला. त्यानंतर खालच्या दुसऱ्या माळ्याच्या किचनच्या वरच्या शेडवर तो अडकून राहिला. हा भयानक घटनाक्रम तिथले नागरीक पाहत होते. मुलाला वाचवण्यासाठी यावेळी शर्थीने प्रयत्न करण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी मुलाला कसं वाचवलं?
अग्निशामक दलाच्या पथकाने मुलाला वाचवल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “हा मुलगा जवळपास 7 वर्षांचा आहे. आम्हाला आधारवाडी अग्निशामक दलाच्या कार्यालयातून फोन आला होता की, मुलगा अडकला आहे. लगेच गाडी फिरून निघाली आणि आम्ही इकडे आलो. आमचे 5 फायरमन आणि 1 ड्रायव्हर असं आमचं पथक होतं. मुलाची आई बाहेर गेली होती आणि मुलगा घरात एकटा होता. त्याच्या शेजारच्यांनी अग्निशामक दलाला फोन करुन माहिती दिली होती. त्यानंतर त्याला सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं”, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
नेमकं काय घडलं? शेचारच्या व्यक्तीने सांगितला घटनाक्रम
वंश ज्या व्यक्तीमुळे वाचला त्यानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “माझं नाव गंधार टकार आहे. मी विठ्ठलवाडीत राहतो. मला जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला. मी तातडीने गॅलरीत गेलो आणि पाहिलं तर तिथे मुलगा लटकताना दिसला. मी वेळ न दडवता आजूबाजूच्या लोकांना आणि अग्निशामक दलाला फोन केला. काय घडलं याची माहिती दिली. यानंतर आग्निशामक दलाचे जवान आले. त्यांनी बघितलं आणि मुलाला रेस्क्यू केलं. मुलाला थोडी दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो बरा होईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.