कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाट्याला काय?; मनपाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या या तरतुदी
यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा सुविधांवर भर देण्यात आलाय. विशेष म्हणजे यंदा शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकाम दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प आज मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांडगे यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची घोषणा केली. नागरिकांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातील, याचा लेखाजोगा त्यांनी यावेळी मांडला. शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गाजत असतानाच शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकाम दंडात्मक कारवाईने अधिकृत करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. शासकीय भूखंडावर नसलेल्या आणि नियमानुसार अधिकृत करता येणाऱ्या इमारती दंड भरून अधिकृत करून घेण्याची मोठी संधी या अर्थसंकल्पात आयुक्तांनी विकासकांना दिली आहे. यामुळे अनधिकृत बांधकामाच्या टांगत्या तलवारीसह जगणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
इतक्या कोटींचा अर्थसंकल्प
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २२०६.३० कोटींचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सभागृहात सादर केला. ते प्रशासक असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला त्यांनी त्यांना असलेल्या अधिकारात त्याला तात्काळ मंजुरीही दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन, क्रीडा सुविधांवर भर देण्यात आलाय. विशेष म्हणजे यंदा शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकाम दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कोणतीही करवाढ झाली नाही
जी बांधकामे नियमित होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील यंदाच्या या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय. यंदा कोणतीही कर वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय .
आरोग्य सुविधा बळकट करण्याची तरतूद
यंदाच्या अर्थसंकल्पात ६८ हेल्थ वेअरनेस सेंटर, नवीन प्रसूतीगृह आणि कॅन्सर सेंटर, कॅथलब, केमोथेरपी केंद्र, रेडीओथेरपी केंद्र, नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पाळीव प्राण्यांचा दवाखाना, अद्ययावत रोगनिदान केंद्र यासारख्या आरोग्य सुविधा बाह्य यंत्रणेकरवी सुरु करण्यात येणार आहेत. शहरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठीची तरतूद आयुक्तांनी केली आहे.
याचवेळी शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देताना स्वच्छ भारत अभियानात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड रिकामे करण्यात येतील. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कार्यान्वित केले जातील. कचरा प्रकल्प वाढवणे, मोबाईल टॉयलेट यासारख्या सुविधाचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी क्रीडा सुविधांवर भर देण्यात आला.