कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मानसिक आरोग्याबद्दल मोठी बातमी समोर, डॉक्टरांकडून मोठा खुलासा
आरोपी विशाल गवळी याने याआधी मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार तपासातून समोर आला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत. आरोपी हा खरंच मनोरुग्ण आहे का? याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांनी आज आरोपी विशाल गवळी याची वैद्यकीय तपासणी केली.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी याच्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल गवळी याने याआधी मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकारही तपासातून समोर आला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणात सखोल तपास करत आहेत. आरोपी हा खरंच मनोरुग्ण आहे का? याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांनी आज आरोपी विशाल गवळी याची वैद्यकीय तपासणी केली. तज्ज्ञ डॉक्टांराच्या माध्यमातून आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यावेळी आरोपी हा खरंच मनोरुग्ण आहे का? याबाबतचं खरं उत्तर समोर आलं आहे. या वैद्यकीय चाचणीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी हा मानसिकदृष्ट्या फिट असून त्याला सायकीएट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही, असा रिपोर्ट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. याबाबत आज झालेल्या त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी हा गोपनीय रिपोर्ट सादर केला आहे.
रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
विशाल गवळी याने आधीच्या काही प्रकरणांमध्ये मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट देऊन जामीन मिळवला होता. त्यामुळे या प्रकरणात त्याची पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची चाचणी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. आज विशाल गवळी याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता डॉक्टरांनी तो मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट दिला आहे. विशाल गवळी हा “वेल ओरिएंटेड, कॉन्शियस, को-ऑपरेटिव्ह, ओरिएंटिंग टू टाइम, प्लेस” असल्याचं डॉक्टरांनी त्याच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. तसेच त्याला कोणत्याही सायकिएट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही. त्यामुळेच तसं ओपिनियन देखील डॉक्टरांनी दिलेलं नाही. त्यामुळे हा नराधम मनोरुग्ण नसून मानसिक दृष्ट्या फिट असल्याचं सिद्ध झालं आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी विशाल गवळी या नराधमाने कल्याण पूर्वेत एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिला घरी नेलं होतं. तिथे आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपीने तिची निर्घृण हत्या केली होती. या हत्येनंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह कल्याण पश्चिमेत बापगाव येथील एका कब्रस्थानाजवळ फेकून दिला होता. या प्रकरणी पीडित मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांकडून पीडितेचा शोध घेण्यात येत होता. या दरम्यान बापगाव येथे एका कब्रस्तानाजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला. यानंतर पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती तपासातून समोर आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं. आरोपीच्या पत्नीने नंतर सर्व घटनाक्रम सांगत कबुलीजबाब दिला होता.
आरोपीची पत्नी ही एका खासगी बँकेत नोकरीला आहे. ती कामावरुन संध्याकाळी घरी आल्यानंतर आरोपीने तिला सर्व घटनाक्रम सांगितला होता. यानंतर त्याच्या पत्नीने घरातील रक्ताचे डाग पुसले होते. त्यानंतर दोघांनी पीडितेच्या मृतदेहाचा विल्हेवाट कसा लावायचा? याबाबत ठरवलं होतं. आरोपी विशाल गवळीने त्याच्या रिक्षावाल्या मित्राला बोलावलं होतं. त्या रिक्षातून ते मृतदेहाला घेऊन बापगावला आले होते. यानंतर परतताना आरोपीने कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात एका वाईन शॉपमध्ये दारु विकत घेतली होती. पोलिसांनी त्या वाईन शॉपचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपी त्यामध्ये कैद झालाय. विशेष म्हणजे आरोपीच्या चेहऱ्यावर गुन्हा केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची भीती किंवा तसा लवलेश बघायला मिळाला मिळत नव्हता. याउलट फक्त माजुरडपणा ठळकपणे दिसत होता. आरोपी यानंतर त्याच्या सासरवाडीला बुलढाण्याला पळून गेला होता. तर त्याची पत्नी कल्याणमध्ये राहत होती. पत्नीला अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला शेगाव येथे दाढी करत असताना एका सलूनच्या दुकानातून अटक केली होती.