7 वर्षांनंतर जेलमधून सुटका होताच त्याने गाठले थेट परीक्षा केंद्र, पण त्याने जो केलाच नव्हता त्यासाठी…
चोरीच्या आरोपात तो तुरुंगात गेला. मोक्का कायद्याखाली तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. जो गुन्हा त्याने केला नाही त्यासाठी नाहक शिक्षा भोगावी लागली तरी त्याचं ध्येय त्याने तुरुंगातही सोडलं नाही.
कल्याण / सुनील जाधव : अनेकदा प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षातूनच यशाचा मार्ग सापडतो. अनावधानाने किंवा जाणून-बुजून केलेल्या कृत्यामुळे व्यक्ती अडचणीत सापडतो. काही वेळेला खोट्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात येते. त्यामुळे त्या व्यक्तीचे खच्चीकरण अर्थात मनोबल ढासळते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही मनोबल ढळू न देणारे हे काही लोक असतात. मोक्का गुन्ह्यात तब्बल सात वर्षानंतर तुरुंगातून बाहेर पडलेल्या तरुणाची यशोगाथा अशाच संकटातून मार्गी लागली आहे. सात वर्षानंतर जामीन मिळाला. मात्र त्याआधीच एक ध्येय निश्चित करून तुरुंगात त्यादिशेने परीक्षेची जोरदार तयारी केली होती. त्यामुळे जामिनावर बाहेर पडताच परीक्षा केंद्र गाठून कायदा अर्थात विधी शाखेची सीईटी देऊन आरोपी तरुणाने आपली प्रबळ इच्छाशक्ती सिद्ध केली आहे.
सात वर्षापूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी केली होती अटक
किशोर रुमाले असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मुरबाड येथील रहिवासी आहे. अंबरनाथमध्ये राहत असताना त्याला मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आरोपी किशोर रुमालेला सात वर्षांपूर्वी उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोक्कासारखा कठोर गुन्हा लावल्यामुळे किशोरची तुरुंगातून सुटका होणे कठीण गोष्ट बनली होती. तो नवी मुंबईच्या तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीची हवा खात होता.
तुरुंगामध्ये वकिलाशी भेट झाली आणि इच्छाशक्तीला दिशा मिळाली
तुरुंगात असतानाच त्याला इतर कैद्यांचे कायदेशीर मदत मिळण्याअभावी होत असलेले हाल दिसले होते. अनेक निष्पाप लोकांनाही खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असल्याचे पाहून तो अस्वस्थ झाला होता. याचदरम्यान तुरुंगामध्ये एका वकिलाशी त्याचा संपर्क झाला. त्या वकिलाकडे किशोरने स्वतःची कायदेविषयक अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली. किशोरचा तुरुंगात असतानाही शिक्षणाकडे असलेला ओढा पाहून वकिलाने किशोरला शक्य ती मदत करण्याचा निर्धार केला होता.