महामारीत कुठेच बेड मिळेना, हतबल कुटुंबाला पोलिसांची साथ, कृतज्ञता व्यक्त करताना रुग्णाच्या भावाचे डोळे पाणावले
रुग्णाच्या भावाने पोलिसांना एक फोन लावला. पोलिसांनी या व्यक्तीसाठी प्रयत्न करुन रातोरात बेड उपलब्ध करुन दिला (Kalyan Police help corona positive patient for admission in Hospital).
कल्याण (ठाणे) : कोरोनाची दुसरी लाट प्रचंड भयानक होती. या लाटेने अनेकांच्या जवळच्या माणसांना हिरावलं. अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणं कठीण होऊन बसलं होतं. या महामारीच्या काळात पोलिसांनी देखील मौल्यवान योगदान दिलं. लॉकडाऊनच्या नियमांचं अंमलबजावणी करण्यासह कोरोनाबाधित कुटुंबांनादेखील मदत करण्याचा प्रयत्न केला. कल्याणच्या एका रुग्णाला तर लंग्स इन्फेक्शन शंभर टक्के झाले होते. ऑक्सिजन लेव्हल 60 वर आली होती. कल्याण ते मुंबई भरपूर प्रयत्न करुन देखील बेड उपलब्ध होत नव्हता. अखेर रुग्णाच्या भावाने पोलिसांना एक फोन लावला. पोलिसांनी या व्यक्तीसाठी प्रयत्न करुन रातोरात बेड उपलब्ध करुन दिला (Kalyan Police help corona positive patient for admission in Hospital).
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात राहणारे व्यासायिक दीपक पाटील यांचे भाऊ कैलास पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणं जास्त आवश्यक होतं. मात्र, कुठेच बेड उपलब्ध होत नव्हते. पाटील यांची आपल्या भावाला उपचारासाठी मुंबईतील कोणत्याही मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याची तयारी होती. मात्र, कुठेच बेड शिल्लक नव्हते (Kalyan Police help corona positive patient for admission in Hospital).
पोलीस मदतीला धावले
दुसरीकडे कैलास पाटील यांना लंग्स इन्फेक्शन शंभर टक्के झाले होते. तसेच मधूमेह, रक्तदाब, ह्रदय विकार हे आजारही होते. कैलास यांचं काय होणार? ही चिंता त्यांना सतावत होती. त्यांनी कल्याणचे एसीपी अनिल पोवार आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यशवंत चव्हाण यांना फोन लावला. चव्हाण हे नाईट ड्यूटीवर होते. दीपक पाटील यांच्या शब्दातून त्यांची वेदना चव्हाण यांनी हेरली. त्यांनी लगेच दोन पोलीस अधिकारी पाटील यांच्या मदतीसाठी पाठविले.
तब्बल महिन्याभराच्या उपचारानंतर रुग्ण घरी
पोलिसांच्या मदतीने कैलास पाटील यांना आर्ट गॅलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा कुठे दीपक यांच्या जीवात जीव आला. कैलास यांच्यावर उपचार सुरु झाले. तब्बल एक महिन्यांच्या उपचारानंतर आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी 7 मे रोजी कैलास बरे होऊ घरी परतले. आता तब्बल दोन महिन्यांनी त्यांची प्रकृती स्थिरावली आहे. फक्त खाकीतल्या माणूसकीमुळे मी जिवंत आहे, असे उद्घार त्यांनी काढले. त्यांचे भाऊ दीपक पाटील यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांचा पोलीस ठाण्यात सत्कार केला. तुमच्यामुळे माझ्या भावाला जीवदान मिळाले, असे शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा : सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई; अवघ्या 15 दिवसात पालिकेकडून काम पूर्ण