दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार
कल्याणमध्ये सहा महिन्यांपूर्वी एका दीड वर्षाच्या चिमकुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, आपल्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक झालेला नसून निष्काळजीपणामुळे झाला आहे, असा आरोप या मुलीच्या पालकांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
![दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/06194019/New-Project162.jpg?w=1280)
कल्याण: कल्याणमध्ये (kalyan) सहा महिन्यांपूर्वी एका दीड वर्षाच्या चिमकुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, आपल्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक झालेला नसून निष्काळजीपणामुळे झाला आहे, असा आरोप या मुलीच्या पालकांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मीडियानेही हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. मात्र, मुलीचं दफन करण्यात आल्याने डॉक्टरांवर (doctor ) गुन्हा दाखल करणं कठिण होऊन बसलं होतं. पोलीस ठाण्यात (police station) अनेकदा खेटा मारूनही गुन्हा दाखल होत नव्हात. मात्र, तरीही या कुटुंबाने चौकशीचा तगदा लावला आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्यांच्या या प्रयत्नांना राजकीय बळही मिळालं. त्यानंतर अखेर सहा महिन्यांनी या चिमुकलीच्या हाडाचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यातून या चिमुकलीचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला की डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने झाला याचं सत्यबाहेर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अवघ्या कल्याणवासियांचे लक्ष लागले आहे.
कल्याण पूर्व भागातील नवी गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा सहा महिन्यांपूर्वी अचानक आजारी पडली होती. आई वडिलांनी तिला सूचकनाका येथील डॉ. आलाम यांच्या क्लिनिक्समध्ये उपचारासाठी नेले होते. तेव्हा डॉक्टरांनी नेहाला तपासून औषधे दिली. पण काही तासानंतर नेहाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप साहानी कुटुंबाने केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मात्र, मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला. दफन करण्यापूर्वी मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलेले नव्हते. कुटुंबियांच्या आरोपाला त्यावेळी आधार नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा दाखल करण्याचे आव्हान होते. परंतू कुटुंबियांनी हे प्रकरण लावून धरले. भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी या कुटुंबियांना मदत केली. कुटुंबियांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने संबंधित डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी या प्रकरणी तपास सुरु केला. तपास सुरु असताना दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणून तपास अधिकारी गोडे नायब तहसीलदार सुषमा बांगर आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली दफन करण्यात आलेल्या मुलीची काही हाडे बाहेर काढण्यात आली. ती तपासाकरीता कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहेत. लॅबचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
आता तरी न्याय मिळेल
मुलीचे हाडे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याने पीडीत कुटुंबियांनी आता तरी न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. तर, या प्रकरणी तपास सुरु आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, असं कल्याण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश पाटील यांनी सांगितलं.
बहिणीची तब्येत बिघडलेय, इमोशनल कारण देत ऑफलाईन OLA बूक, अर्ध्या वाटेत ड्रायव्हरला… https://t.co/1XEC5cyrL5 #Crime | #Loot | #Robbery
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2022
संबंधित बातम्या: