आम्हाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्या, केडीएमसी अधिकाऱ्यांची मागणी, ठाण्यातील घटनेच्या विरोधात कामबंद आंदोलन
फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीमधील अधिकाऱ्यांनी एक दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारले आहे.
कल्याण (ठाणे) : फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीमधील अधिकाऱ्यांनी एक दिवसांचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई व्हावी. गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे. यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी यावेळी अधिकाऱ्यांनी केली.
सर्व अधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक होणार आहे. त्यामुळे अशा घटना का घडतात? यावर विचारविशर्म केला जाणार आहे. महापालिकाकडे पोलीस आहेत. मात्र अधिकाऱ्यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वात केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिलं.
प्रकरण नेमकं काय?
ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान 30 ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपींवर कठोर कारवाई, एकनाथ शिंदेंचे आश्वासन
ठाणे महानगरपालिका हद्दीत एखाद्या फेरीवाल्याकडून थेट महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेत सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरील उपचारांची सर्व जबाबदारी ठाणे महानगरपालिकेने घेतली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी कल्पिता पिंपळेंना राज ठाकरेंचा शब्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.
तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :
लवकर बऱ्या व्हा, बाकीचं आम्ही बघतो, फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी कल्पिता पिंपळेंना राज ठाकरेंचा शब्द