खासगी लक्झरी बस मालकांकडून ऐन दिवाळीत प्रवाशांची अक्षरश: लूट, खान्देश हित संग्रामचा मोठा इशारा
खान्देश हित संग्राम संघटनेच्या आंदोलनावेळी अनेक प्रवासी या आंदोलनात सहभागी झाले. अनेकांनी आपले वेगवेगळे अनुभव शेअर केले. एका महिलेकडून 1800 रुपये भाडे आकारण्यात आलं होतं. तर दुसऱ्या एका व्यक्तीकडून जळगावला जाण्यासाठी तब्बल 2 हजार रुपये भाडे आकरण्यात आल्याचं स्वत: प्रवाशांनी सांगितलं.
कल्याण शहरातून राज्यातील विविध शहरांसाठी खाजगी लक्झरी बसने मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक केली जाते. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या साधनांची कमतरता आणि पुरेशा रेल्वे प्रवासी गाड्या उपलब्ध नसल्यामुळे बरेचसे गरजू प्रवासी या खासगी लक्झरी बसने प्रवास करतात. या परिस्थितीचा फायदा उचलून खाजगी प्रवासी वाहतूकदार वर्षभर मनमानी पद्धतीने सार्वजनिक एसटी बस भाड्या पेक्षा दुप्पट तिप्पट आकारणी करतात. विशेष म्हणजे कल्याणहून जळगावला जाणाऱ्या खासगी लक्झरी बसवाले आता एका सीटचे तब्बल 2 हजार रुपयांपर्यंत भाडे आकारत आहेत. आता दिवाळी सण असल्याने हा दर आणखी फुगवला जातो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची प्रचंड लूट होते.
खासगी लक्झरी बस मालकांच्या या लूट विरोधात कल्याणमध्ये खान्देश हित संग्राम संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने आज कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देवून संबंधित लक्झरी बस चालकांना समज देण्याची विनंती केली आहे. तसेच खान्देश हित संग्रामचे पदाधिकारी आज कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात जमले आणि त्यांनी लक्झरी बस चालकांना याबाबतचे निवेदन दिले आहेत. लक्झरी बस मालकांनी त्याची नोंद घेतली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा खान्देश हित संग्राम संघटनेकडून देण्यात आला आहे.
खासगी लक्झरी बस चालकांकडून ऐन दिवाळीत प्रवाशांची अक्षरश: लूट होत असल्याचा आरोप, कल्याणमध्ये खान्देश हित संग्रामचा मोठा इशारा #kalyan #kalyannews #khandesh #khandeshhitsangram pic.twitter.com/Oc5oOWgpzK
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) October 25, 2024
खान्देश हित संग्राम संघटनेच्या आंदोलनावेळी अनेक प्रवासी या आंदोलनात सहभागी झाले. अनेकांनी आपले वेगवेगळे अनुभव शेअर केले. एका महिलेकडून 1800 रुपये भाडे आकारण्यात आलं होतं. तर दुसऱ्या एका व्यक्तीकडून जळगावला जाण्यासाठी तब्बल 2 हजार रुपये भाडे आकरण्यात आल्याचं स्वत: प्रवाशांनी सांगितलं. त्यामुळे खान्देश हित संग्राम संघटनेकडून या अनधिकृत भाडेवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.