एक किलोमीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा दिसल्या, ठाण्यात 10 तास अग्नितांडव; ओरियन बिझनेस पार्क जळून खाक
ठाणेकरांसाठी कालचा दिवस अत्यंत वाईट होता. काल ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बिझनेस पार्क जळून खाक झाला आहे. तसेच आगीमुळे मोठी वित्तहानी झाली आहे. तब्बल दहा तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
हिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे : घोडबंदर रोडवरील वंडर मॉलजवळील ओरियन बिझनेस पार्कला काल रात्री भीषण आग लागली होती. ही आग इतकी भयानक होती की ती रात्रभर सुरू होती. तब्बल 10 तास चाललेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. पण या आगीत संपूर्ण ओरियन बिझनेस पार्क जळून खाक झाला आहे. या बिझनेस पार्कमधील पार्किंगमधील कार आणि बाईकही जळून खाक झाल्या आहेत. या आगीतून 100 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. आगीत मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या या पार्कमध्ये कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
काल रात्री 8.30 वाजता घोडबंदर रोडवरील ओरियन बिझनेस पार्कला भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर लागलेली ही आग बघता बघता चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीने अत्यंत आक्राळविक्राळ रुप धारण केलं होतं. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पार्कमधील लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. पण कुमक कमी पडल्याने आणखी चार महापालिका श्रेत्रातील अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. या अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवतानाच 100 जणांना सुखरूप बाहेर काढलं.
काहीच उरलं नाही
आग अत्यंत भीषण होती. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले. काही मार्ग बंद करण्यात आले. परिणामी या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आगीची घटना समजल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक आमदार निरंजन डावखरे यांन घटनास्थळी धाव घेतली होती. रात्रभर ही आग भडकलेली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर जागून न थांबता ही आग नियंत्रणात आणली. 10 तासानंतर ही आग नियंत्रणात आणली. पण संपूर्ण पार्क जळून खाक झाला होता.
या चार मजली पार्कमध्ये 80 ते 90 गाळे होते. हे संपूर्ण गाळे जळून खाक झाले आहेत. पार्कच्या खाली पार्किंग होतं. तिथल्या 20 बाईक जळून खाक झाल्या आहेत. तसेच पाच कारचाही कोळसा झाला आहे. या आगीत काहीच वाचलं नाही. सर्वकाही जळून खाक झालं. फक्त माणसं तेवढी वाचली. आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एक किलोमीटरपर्यंत आग दिसत होती
ही आग अत्यंत भयंकर होती. संपूर्ण इमारतच पेटल्याने आगीचं तांडव झालं होतं. एवढच कशाला एक किलोमीटरपर्यंत आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. इतकी ही आग भीषण होती. त्यामुळे स्थानिक नागरिकही घाबरून गेले होते. आगीमुळे पार्क परिसरात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. त्याचवेळी पार्किंगमधील कार आणि मोटारसायकलनेही पेट घेतला. काही कारमध्ये तर स्फोट झाला. त्यामुळे स्थानिक लोक अधिकच घाबरून गेले होते.