ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी हल्ला केलाय त्यांना आधी समजेल, मग सर्वांना समजेल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. मनसेचा आज (9 मार्च) 17 वा वर्धापन दिन सोहळा आहे. या निमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे बोलत होते.
संदीप देशपांडे मॉर्निंग वॉक करत असताना 3 मार्च रोजी शिवाजी पार्क इथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तेव्हा या टोळक्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
राज ठाकरे यांनी आपला संदीप कुठे आहे म्हणत संदीप देशपांडे यांना मंचावर बोलावलं. तसेच यावेळेस आत्मचरित्राची 4 पानं वाढली, असं म्हणत राज ठाकरे यांनी गंमत केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकचा हशा पिकला.
“घटना घडल्यानंतर मी त्या दिवशी बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं की हे कुणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्यांनी केलंय हे त्यांना आधी समजेल की हे त्यांनी केलंय. त्यानंतर सर्वांना समजेल की हे त्यांनी केलंय. मी माझ्या मुलांचं रक्त असं वाया घालवू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आलेत, या फडतूस लोकांसाठी नाही”, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
“आपण सत्तेपासून दूर नाही, हे मळभ दूर होईल. मी नुसती आशा दाखवत नाही. मला हे माहिती आहे. महापालिका जिंकायच्या आहेत. कधी निवडणूक होईल माहीत नाही. कधीही निवडणुका होऊदेत, महापालिकेत आपण सत्तेत असणार म्हणजे असणार”, असा आशावादही यावेळेस राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान राज ठाकरे यांची 22 तारखेला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सभा घेणार आहेत. या सभेत सर्वांनी यावं, असं आमंत्रण राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिलं. तसेच मला जे काही राजकीय बोलायचंय ते तेव्हाच बोलेन, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.