सांगली, माहीमनंतर मनसेचा मोर्चा आता थेट मुंब्र्यात, अनधिकृत मशिदीवर कारवाईची मागणी, अन्यथा…
राज ठाकरे यांनी माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झालेली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून 7 ते 8 अनधिकृत दर्गे उभारल्याचा दावा ठाणे शहर मनसेकडून करण्यात आला आहे.
ठाणे : माहीम दर्ग्यानंतर ठाण्यातील मुंब्रा (Mumbra) परिसरात अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून (MNS) जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अनधिकृत मिशिदींवर कारवाई न झाल्यास 15 दिवसांनंतर त्या परिसरात मंदिर उभारू, असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृतपणे मशीद बांधण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या वतीने शासनाला पूर्वसूचना देण्यात आलेली आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्क्रीनवर माहिमच्या समुद्रात एका बेट सदृश्य जागेत एक मजार तयार करण्यात आल्याचा व्हिडिओ दाखवला होता. या मजारीला भेट देण्यासाठी अनेक लोकांची ये-जा सुरु असल्याचंही त्यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत सांगितलं होतं. तसेच या ठिकाणी दुसरं हाजीआली तयार होत असल्याचा आरोप करत शासनाचं दुर्लक्ष असलं की असे अनधिकृत बांधकामाचे प्रकार होत असतात, असा आरोपही केला होता. त्यानंतर आज त्या बांधकामावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
अशातच ठाण्यातील मुंब्रा परिसरात सध्या झपाट्याने अनधिकृतरित्या मशिदीचे बांधकाम करण्यात येत आहे. यासंदर्भात मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 15 दिवसांनंतर मंदिर बांधण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकारी यांना निवेदन देताना मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे इतर मनसैनिक उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत. या दर्ग्याची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.
या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांचेकडून सर्व सोईसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का ? तसेच हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. या जागेवर अतिक्रमण करत असलेले भूमाफिया नक्की कोण आहेत? यांना पाठीशी कोण घालत आहे? या सर्व गंभीर गोष्टींची दखल घेऊन येत्या १५ दिवसांत हे अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच दर्ग्याच्या बाजुला हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरु करेल. असा इशारा यावेळी अविनाश जाधव यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सांगलीतील अनधिकृत मशीद जमीनदोस्त
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या सांगलीतील अनधिकृत मशिदीचे बांधकाम अखेर पाडण्यात आले आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण पथकाने सदर जागेवरील बांधकाम पाडले. सदर जागेवर महापालिका शाळेचं आरक्षण असून कोणतीही परवानगी याठिकाणी घेण्यात आला नाही. त्यामुळे सदरच्या जागेवरील बांधकाम बेकायदेशीर असल्याचं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानुसार आयुक्त सुनील पवार यांनी सदरचे अतिक्रमण पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून बांधण्यात आलेले बांधकाम पाडण्यात आले. मनसेकडून पालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाई बद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे.