कोरोना काळातील भत्ता, अनेक मागण्या प्रलंबित, अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचं आमरण उपोषण
अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कामगार सेनेनं अंबरनाथमध्ये आमरण उपोषण सुरु केलं आहे.
अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कामगार सेनेनं अंबरनाथमध्ये आमरण उपोषण सुरु केलं आहे. कोव्हीड भत्ता, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि अन्य मागण्या पूर्ण करण्याची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात
अंबरनाथ नगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी मिळून 714 कामगार कार्यरत आहेत. तर सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या 250 ते 300 च्या घरात आहे. या कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अजूनही मिळालेला नाही. सेवेची 12 आणि 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणारा भत्ता अजूनही मिळालेला नसून निवृत्त कर्मचारीही या भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर कोव्हीडच्या काळात अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणाऱ्या या कामगारांना कोव्हीड भत्ता अजूनही मिळालेला नाही.
अनुकंपा तत्त्वावरील भरती रखडल्याचा मनसेचा आरोप
अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियाही रखडलेली आहे. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार आणि आंदोलनं करण्यात आली. मात्र तरीही दरवेळी फक्त आश्वासनंच मिळाल्याचा कामगार सेनेचा आरोप आहे. त्यामुळेच आता अखेरचा पर्याय म्हणून कामगार सेनेने आमरण उपोषण सुरु केलं आहे.
आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी
कामगार सेनेचे अंबरनाथ पालिका युनिटचे अध्यक्ष सूर्यकांत अनार्थे आणि उल्हासनगरचे मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी झाले आहेत. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हेही वाचा : VIDEO : फाडफाड इंग्रजी, कचरा वेचणाऱ्या आजींचं इंग्रजी ऐकून चकीत व्हाल!