गोळ्या झेलण्याच्या वल्गना उगीच करू नका, आमदार राजू पाटलांचा खासदार शिंदेना टोला
रेल्वेने झोपडीधारकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यावरून शिवसेना आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे. रेल्वे लगतच्या झोपडीधारकांसाठी अंगावर गोळ्या झेलू असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं.
कल्याण: रेल्वेने झोपडीधारकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यावरून शिवसेना आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे. रेल्वे लगतच्या झोपडीधारकांसाठी अंगावर गोळ्या झेलू असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. त्याला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिलं आहे. गोळ्या झेलण्याच्या वल्गना करू नका. नौटंकी बंद करा, असा टोलाच राजू पाटील यांनी लगावला आहे.
गुरुवारी कोपर आणि कल्याण आनंदवाडी येथील रेल्वेने नोटिसा दिलेल्या झोपडीधारकांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी एका बाधित आजीबाईने आम्ही गोळ्या झेलू मात्र घरे खाली करु देणार नाही, असा निर्धार या आजीने व्यक्त केला होता. त्यावर तुम्ही कशाला गोळ्या झेलता. आम्ही आहोत ना गोळ्या झेलण्यासाठी, असं खासदार शिंदे म्हणाले होते. त्यावर राजू पाटील यांनी ट्विट करून हा हल्लाबोल केला आहे.
तुमची घरे तुटणार नाही
रेल्वेने नोटिसा बजावलेल्या झोपडीधारकांच्या पाठीशी प्रत्येकजण आहे. मग ते मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे असोत. मनसेचाही या झोपडीधारकांना पाठिंबा आहे. सरकार तुमचे आहे. तुम्ही रेल्वेवर उतरा. तुमच्या हाती प्रशासकीय यंत्रणा आहे. आपल्या पदरात झाकून पहा. आपण स्वत: काय करतोय. मगच गोळया झेलण्याच्या वल्गना करा. निवडणूका आल्या की लोकांना घाबरवायचे. मजबूर करायचे. मग मते गाळा करायची. हे धंदे आता सुरु झालेत. माझा लोकांनाही सल्ला आहे की, अशांना भरीस पडू नका. तुमची घरे तूटणार नाहीत. मनसेचा नेता म्हणून मी तुम्हाला आश्वासीत करतो. आम्ही स्वत:ही त्याठिकाणी भेट देणार आहोत. परंतु अशा लोकांना आणून राजकारण कोणी करु नये. या मताचा मी आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या पुनर्वसनाचे काय केले?
दिव्यातील लोकांना दिवाळीत बेघर करण्यात आले. रिंगरोडमधील बाधित गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांचीही घरे बाधित झाली आहेत. तसेच पत्रीपूलाला जोडणाऱ्या 90 फूटी रस्त्यावरील बाधितांना घरे मिळालेली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय केले? घरे वाचविण्याच्या वल्गना उगीच काय करता?, असा खरमरीत सवाल त्यांनी केला आहे.
एैन दिवाळीत दिवा येथे रेल्वे पुल बाधितांना रस्त्यावर आणणारे,९० फुट रस्तेबाधितांना अजूनही घरे न देणारे,अटाळी येथील रिंगरूट मध्ये बाधीत झालेल्यांबद्दल चकार शब्द न बोलणारे रेल्वेबाधितांसाठी चक्क छातीवर गोळी झेलण्याच्या गोष्टी करत आहेत, ही तर शुद्ध नौटंकी आहे. #नक्राश्रू pic.twitter.com/RzX3VGwiu5
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) January 22, 2022
संबंधित बातम्या:
धक्कादायक! गौरीपाडा तलावाच्या काठावर एकाच वेळी अनेक कासवांचा मृत्यू, नागरिकांमध्ये खळबळ
Kalyan Crime : कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप