‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत’, मनसे आमदार राजू पाटील यांचं वक्तव्य
"राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दुसऱ्यांदा मला संधी दिली. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. पण राज ठाकरे यांनी माझं नाव घोषित केले. यामुळे मी आनंदीत आहे", अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून आज विधानसभा निवडणुकीसाठी दोन नावांची घोषणा करण्यात आली. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या नावाचा त्यामध्ये समावेश आहे. तर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या देखील नावाची घोषणा राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. राज ठाकरे आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डोंबिवली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना राज ठाकरे मुख्यमंत्री होतील का? अशा आशयाचा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही आशा माझी देखील आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा ही जागा आम्ही राज ठाकरे यांना निश्चित काढून दाखवू”, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.
“राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दुसऱ्यांदा मला संधी दिली. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. पण राज ठाकरे यांनी माझं नाव घोषित केले. यामुळे मी आनंदीत आहे. राज ठाकरेंनी जाहीर केलं की, सर्व पक्षांपेक्षा जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवू. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले राजकारण, तीन मुख्यमंत्री, तीन राज्यपाल, पक्ष फोडाफोडी या सर्व विषयाला लोकं कंटाळलेली आहेत. आरक्षणाच्या नावावर खोटे वादे करतात. लोकांमध्ये या विरोधात रोष आहे आणि लोकांना सक्षम पर्याय पाहिजे. 2009 मध्ये जो ओढा होता त्याप्रमाणे लोक आता राज ठाकरेंकडे पाहत आहेत. यामुळे भरभरून यश येईल ही आम्हाला खात्री आहे”, असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभेत महायुतीला पाठिंबा का दिला?
“लोकसभेत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. मतांचं विभाजन होऊ नये याचा प्रयत्न मनसेने केला. मात्र कल्याणमध्ये देखील याचा फटका पडलेला दिसला. कारण या ठिकाणी सर्वांची नाराजी आहे. आम्ही कुठल्या अपेक्षांनी काम केली नाही. आमची काही कामे असतील किंवा मागणी असतील ती पूर्ण करावे. यासाठी आम्ही भरभरून मतं त्यांना दिलेली आहेत आणि त्यांचं काम केलं”, असं राजू पाटील यांनी सांगितलं.
‘आता त्यांनी परतफेड करावी’
“महायुती आम्हाला पाठिंबा देईल, असं आम्हाला काही कळालं नाही. मात्र ते अप्रत्यक्षरित्या जरी मदत करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. राज ठाकरेंनी आम्हाला आदेश दिला आणि आम्ही त्यांचे कामे केली आहेत. मात्र आता त्यांचा कॉल आहे. लोकसभेत काम केलं. आता त्यांनी परतफेड करावी, असं कार्यकर्त्यांना वाटतं. मात्र माझे कार्यकर्ते माझ्यावर जीव टाकतात. कुठलीही परिस्थिती आली तर माझ्यासाठी धावतील”, असं राजू पाटील म्हणाले.
“ठाणे आणि कल्याण ग्रामीणमध्ये आम्ही इच्छुक आहोत. मात्र आमच्या अनेक जागांवरती दोन ते तीन-तीन जण इच्छुक आहेत. ज्या विधानसभेमध्ये आमचा उमेदवार येणार नाही हे आम्हाला कळालं तर त्या ठिकाणचे कार्यकर्ते आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा कशी पक्की होईल यासाठी रणनीती ठरवत आहोत”, अशी माहिती राजू पाटील यांनी दिली.
‘कल्याणसह ठाण्यात जास्तीत जास्त जागा लढणार’
“आमच्या काही सीट सुटतील. मात्र सर्व जागा सुटणार नाहीत. कल्याणसह ठाण्यात जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत. आमची दखल घेण्यात येईल अशा परिस्थितीचा कल आम्हाला जनतेकडून दिसत आहे. सर्वपक्षीय जागा लढत आहेत, त्यापेक्षा जास्त जागा आम्ही लढतोय. आता लोकांना खोटे आश्वासन देवून किती जागा निवडून द्यायचं त्या त्या पक्षांनी ठरवावं”, असंदेखील राजू पाटील यावेळी म्हणाले.