उल्हासनगर : उल्हासनगरात मोबाईलचं दुकान फोडून 18 लाख 72 हजार रुपयांचे अॅपल (Apple) कंपनीचे फोन चोरल्याची घटना रविवारी घडली आहे. चोरीची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॅम्प 3 मधील साउंड ऑफ म्युझिक दुकानाचे छत तोडून चोरटा शिरला. त्यानंतर अॅपल कंपनीचे मोबाईल चोरून पसार झाला. उल्हासनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच चोरट्याला बेड्या ठोकल्या. चोरट्याकडून 18 लाख 11 हजारांचे फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. महमद फिरोज नईम अहमद असं या चोरट्याचं नाव आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत या चोरट्याचा माग काढायला सुरुवात केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बीटमार्शल अशोक मोरे आणि राजेंद्र कोगे या दोघांनी गस्तीवर असताना त्याला पकडलं.
उल्हासनगरमध्ये दुकान फोडून 18 लाख 72 हजार रुपयांचे मोबाईल चोरले#Ulhasnagar #MobileTheft #AppleMobile #CCTV pic.twitter.com/bNWn1xNKGt
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2022
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साऊंड ऑफ म्युझिक नावाचं मोबाईलचं दुकान आहे. रविवारी पहाटे 5 च्या सुमारास या दुकानाचे बाहेरचे छत तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. दुकानातील 18 लाख 72 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरुन चोरट्याने पोबारा केला. चोरी केलेल्या मोबाईलची बॅग चोरट्याने उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या टॉयलेटमध्ये लपवली आणि प्लॅटफॉर्मवरच झोपला. सकाळी दुकानमालकाने दुकान उघडल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दुकानमालकाने तात्काळ उल्हासनगर पोलिसांना चोरीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आणि अवघ्या काही तासातच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चोरी केलेले मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत. आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या वेगवान तपासाबद्दल उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस नाईक अशोक मोरे आणि पोलीस शिपाई राजेंद्र कोगे यांचं ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी अभिनंदन करत त्यांना बक्षीस जाहीर केल्याची माहिती पोलीस उपयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.
चोरटा महमद फिरोज नईम अहमद याने यापूर्वी 2 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्री अंबरनाथच्या राजेश मोबाईल्स या दुकानात अशाच पद्धतीने चोरी केली होती. या दुकानाचे पत्रे फोडून छत तोडून त्यानं दुकानात प्रवेश केला होता. त्यावेळीही त्याने 14 लाख रुपयांचे मोबाईल चोरले होते, ज्यामध्ये अॅपल कंपनीच्या फोन्सचाच प्रामुख्याने समावेश होता. त्या प्रकरणात त्याला अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली आणि 8 महिन्यांनी त्याने उल्हासनगरात हा दुसरा गुन्हा केला.
आरोपी महमद फिरोज नईम अहमद हा तिसरीपर्यंत शिकला असून तो आतापर्यंत 3 वेळा दुबई फिरून आलाय. अंबरनाथच्या मोहन नॅनो इस्टेट या पॉश सोसायटीत तो राहतो. अंबरनाथच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्यावेळी त्याच्याकडून वैयक्तिक वापरातले दोन आयफोन, एक आयपॅड, एक लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला होता. त्यामुळे महमद फिरोज नईम अहमद हा अल्पशिक्षित, पण शौकीन चोरटा असल्याचं समोर आलं होतं.