आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट झालं तर…; आनंद दिघे यांची पत्र लिहिणाऱ्या सेवेकरीकडून वेदना व्यक्त
Nandkumar Gorule on Anandashram Viral Video : आनंद दिघे यांची पत्र लिहिणाऱ्या सेवेकरीकडून वेदना व्यक्त... रिक्षातून, गाड्यांमधून जाणारे लोक बाहेरून आनंदाश्रमाला पाहून नमस्कार करायचे. आज पैशाच्या जोरावर तुम्ही आनंदाश्रमाचं काय करून ठेवलं आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतींची साठवण असलेल्या ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमात नोटा उधळल्याचं समोर आलं आहे. यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. आनंद आश्रमात आनंद दिघे यांचे पत्र लेखन करणारे, आनंद दिघे यांचे सेवेकरी नंदकुमार गोरुले यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आनंद आश्रमाचं जर पावित्र्य नष्ट झालं तर माझ्यासारखा एक शिवसैनिक हे खपून घेणार नाही हे लक्षात ठेवा. आता सोबत किती येतील ते आगामी काळ ठरवेल, असं गोरुले यांनी म्हटलं आहे.
पैशांनी साहेबांना विकत घेणार; गोरुलेंचा सवाल
माझा आज संपूर्ण ठाणेकरांना आणि महाराष्ट्राला एक प्रश्न आहे जे जे आनंदाश्रमात हजेरी लावून गेलेले आहेत. आज जो हा काही नंगानाच सुरू आहे. हे विचारणारे ठाण्यात फक्त एक राजन विचारेच आहेत का? माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय, तुमच्यासारखे 50 मुख्यमंत्रिपद आम्ही साहेबांवरून ओवाळून टाकू…. सर्व सणांचा एक आदर्श वस्तूपाठ हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यालयातून बघितला जायचा. त्याचं आचरण अनुकरण संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात व्हायचं आणि तुम्ही आज सांगताय साहेबांनी ही परंपरा पाडली. साहेबांच्या नावावर काय काय खपवता, तुमचा पैसा एवढा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्या? राजकीय यशावर तुम्ही दिघे साहेबांचं मोजमाप ठरवता?, असा सवाल नंदकुमार गोरुले यांनी केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात आणि ठाण्यात तुम्हाला चॅलेंज देणारा एकच वाघ आहे तो म्हणजे राजन विचारे आहेत. दिवसाला दीडशे पत्र मी एकटा लिहायचो, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे दुःख पिणारा महादेव आमचा त्या शिवालयात बसायचा आज पैसे उधळून असं त्यांना तुम्ही बदनाम करतात. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नका… आम्हाला तुमची माफीच नकोच आहे. नरेश म्हस्के तुम्ही काय होता ओ, काय म्हणता तुम्ही, जॅकेट कोड घातला म्हणून तुम्ही काय देशाचे नेते झालात संपूर्ण ठाणे तुम्ही संपवल, ठाण्याला आणि ठाणेकरांना बदनाम केलंत, असंही गोरुले यांनी म्हटलं आहे.
गोरुलेंकडून आठवणींना उजाळा
आनंद दिघे साहेब मला नंदू म्हणायचे. 85 ते 95 पर्यंत साहेबांची पत्र मीच लिहीत होतो. मी फक्त साहेबांची पत्र लिहीत नव्हतो तर साहेबांचे संदेश आणि काही वेळेला त्यांच्या मुलाखती देखील मीच लिहीत होतो. ते भाग्य मला लाभलेले आहे. त्यावेळेला राजन विचारे साहेब असायचेच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं. साहेब रुग्णालयात असताना त्यांना आंघोळ घालणं, त्यांना जेवण भरवणं. त्यांचे पाय चेपण हे सर्व करायला मला मिळालं हे कुठल्या जन्मीचं पुण्य होत हे मला माहीत नाही, असं नंदकुमार गोरुले यांनी म्हटलं आहे.