Jayant Patil: केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं मोठं नुकसान केलंय, जयंत पाटील यांची भाजपवर टीका
फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याची टीका केली.
डोंबिवली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओबीसी आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका ही भाजप नेत्यांकडून केली जाते. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा मोठे नुकसान केलंय. ओबीसींचा पुन्हा सर्व्हे करण्याची पाळी आता केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आलीये. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार कुठे कमी पडणार नाही मात्र मुद्दामून खोडा घालण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अशी भूमिका घेतली आहे.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच गोष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या विरोधी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याची टीका केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज डोंबिवलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आयोजित शरद महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.
ओबीसी आरक्षणाबाबतचा इम्पॅरिकल डेटा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात देणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने लोकसभेमध्ये जे उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे त्यात इमपरिकल डेटा जवळपास 98 टक्के बरोबर असल्याचं विधान केले होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा डेटा कोर्टात देताना त्यात बऱ्याच त्रुटी आहेत असं विरोधी विधान केलं आणि आता म्हणतात की डेटा उपलब्ध नाही या सगळ्या भूलथापा केंद्र सरकारच्या भाजपच्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न
सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला. एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते. दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती. त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली. याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी सांगितले.
येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढणार
गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी काही नगरसेवक हे राष्ट्रवादी सेना इच्छुक आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीची नगरसेवकांची संख्या ही लक्षणीय वाढ झालेली असेल असं स्पष्ट केलं. दरम्यान, नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी झाली तर भाजपचा पराभव निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. (NCP leader Jayant Patil criticizes central government over OBC reservation)
इतर बातम्या
Kalyan: कल्याणमध्ये रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेला अन् ओमिक्रॉनचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह