Ambernath NCP Protest : अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीचे आमरण उपोषण, प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप
आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदार याद्या आणि अंतिम प्रभाग रचनाही जाहीर झाली आहे. मात्र यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठा घोळ केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा राष्ट्रवादी (NCP)चा आरोप आहे. निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या अंतिम मतदार याद्या (Voter List) आणि प्रभाग रचना (Ward Structure) याबाबत फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर काँग्रेस, भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्येही नाराजीचा सूर आहे. माजी नगरसेवक कबीर गायकवाड, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष मनोज सिंग आणि महिला कार्यकर्त्या रेश्मा धनंजय सुर्वे यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळं प्रशासकीय पातळीवर या सगळ्याची दखल घेतली जाते का? हे आता पाहावं लागणार आहे.
अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
अंबरनाथ नगरपालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदार याद्या आणि अंतिम प्रभाग रचनाही जाहीर झाली आहे. मात्र यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठा घोळ केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. एका प्रभागातील नावं भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्या भलत्याच प्रभागात टाकणं, अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी जाणीवपूर्वक ईव्ही ब्लॉक दुसऱ्या प्रभागात हलवणं, हरकती नसलेल्या प्रभागांच्या रचनेत बदल होणं अशा अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. याविरोधात मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग अशा सर्व ठिकाणी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (NCP on hunger strike in Ambernath over ward structure and voter list)