अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीने काढली सिलेंडरची अंत्ययात्रा, इंधन दरवाढीविरोधात उद्विग्नता व्यक्त
देशात उडालेला महागाईचा भडक आणि इंधनाचे दररोज वाढत चाललेले दर, याविरोधात अंबरनाथमध्ये आज चक्क गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली.
अंबरनाथ (ठाणे) : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. या संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांवर पगारकपातीचं संकट ओढावलं. त्यामुळे अनेकांनी नैराश्यात जावून आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या. सर्वसामान्य एककीडे आर्थिक संकटाला तोंड देत असताना पेट्रोल, डिझेल यांचे दर गगनाला भिडले. त्यासोबत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांनी तर प्रचंड उसंडी मारली.
विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या किंमती तब्बल 860 रुपयांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारप्रती असंतोष निर्माण झाला आहे. याच उद्विगनतेतून अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढून आंदोलन केलं. या आंदोलनाची आता शहरभरात चर्चा आहे.
कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
आंदोलक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल यांची दरवाढ झालेली असतानाच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे भाजीपाला, अन्नधान्य अशा सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक अक्षरशः भरडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चक्क गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढली, अशी भूमिका आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी मांडली.
हेही वाचा :
‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टीका