‘या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची’, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
"लोकसभेच्या निकालावरून यांना काही समजलं नाही का? महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं आवडत नाही. विकसित भारत आहे आणि आपण त्यात दंगली पेटवत आहोत. काही ना काय कारण घेत दररोज काहीतरी घडवून आणतात", असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीतील घटनेवरुन महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे”, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “मला जे काही भिवंडीमधलं समजलं आणि दोन्ही समाजामधून समजलं की दंगल झाली असती जर या माणसाने मध्ये उडी घेतली नसती आणि या माणसाने उडी घेतली आणि दंगल थांबली आणि दंगल थांबवल्यानंतर हे बक्षीस मिळालं असेल तर पोलिसांच्या खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. अंतर्गत हे देखील मला माहित आहे की, पोलिसांनी देखील याला विरोध केला आहे. तरी देखील बदली करण्यात आली. या मागे तिकडच्या बीजेपीच्या तिथला राजकीय नेता दंगल घडवू इच्छित होता आणि ही दंगल झाली नाही. त्याचे परिणाम डीसीपीला भोगावे लागले. याचा अर्थ स्पष्ट आहे. या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे आणि पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचं आहे”, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच “मी पोलिसांनाच विनंती करेल. तुम्ही हत्यार बनवू नका. यांना दंगल घडवायची आहे”, असंदेखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“भिवंडीच्या डीसीपीची तडकाफडकी बदली, त्याच्यामागे असलेली कारण, याबाबत मी पत्रकार परिषद घेत आहे. गणपती विसर्जनाच्या आधी दंगल होता होता वाचली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. सगळ्यांना पळवून लावलं हे काही लोकांना पटलेलं दिसत नाही. त्यामुळे सरकारने त्या पोलीस अधिकाऱ्याची, त्याची उचलबांगडी केली. दंगल थांबवणं हा पोलिसांचा गुन्हा आहे का?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
‘ज्या माणसाने दंगल थांबवली त्याची बदली का केली?’
“पोलीस शिकून येतात तेव्हा या देशाच संविधान हे प्रमाण मानलं जातं. संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही वागू शकत नाही आणि सरकारचं हत्यार तुम्ही बनू शकत नाही. सरकारचा हत्यार म्हणून दंगली घडवून आणणे हे पोलिसांचे काम नाही. ज्या माणसाने दंगल थांबवली त्याची बदली का केली? काही घडलं असतं आणि हत्या झाली असती तर गोष्ट वेगळी आहे. मात्र काही न झाल्याने त्याचं बक्षीस म्हणून त्याची बदली 24 तासाच्या आत केली?”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘मुसलमानांनी जगायचं नाही का?’
“लोकसभेच्या निकालावरून यांना काही समजलं नाही का? महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं आवडत नाही. विकसित भारत आहे आणि आपण त्यात दंगली पेटवत आहोत. काही ना काय कारण घेत दररोज काहीतरी घडवून आणतात. बिहारमध्ये गोळीबार झालाय, नंतर 80 दलितांची घरे जळण्यात आली. हा जंगलराज आहे का?” असा सवाल आव्हाडांनी केला. तसेच “मुसलमानांनी जगायचं नाही का? त्यांना स्पष्ट सांगा की, तुम्ही देशाचे नागरिक नाहीत. मतदानात तुम्हाला अधिकार नाही. कुठली व्यवस्था मिळणार नाही. मात्र सगळं देऊन उपाशी ठेवणं हे योग्य नाही”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
‘मविआ नेत्यांना विनंती करणार की…’
“मी आता सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार आहे की, सगळ्यांनी एकत्र या. आपण सर्व त्या ठिकाणी जाऊ. देशाचं शोषण करणाऱ्यांविरोधात आपण सगळे उभे राहू. शोषण करताना ते ताकदवान होत गेले तर आपण काहीच करू शकणार नाही. ज्याचं शोषण होतं त्याला आपण ताकद दिली पाहिजे. ती ताकद देताना आपण त्यांच्याबरोबर दिसले पाहिजे. बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्या मनातला समाजवाद कुठे केला? नितेश कुमार भाजपमध्ये पार्टनर आहेत. यावर भाजपने आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. ज्यांच्या समर्थनावरती तुमचं राज्य चालू आहे त्यांच्याच राज्यावरती दलित वस्ती पेटवली गेली आहे. भाजपचे दलितांबद्दल काय विचार आहेत?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला.